WhatsApp

शिंदे शिवसेना पदाधिकारी चालवत होता कुंटणखाना; गुन्हा दाखल होताच फरार

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील कॅनल रोडवर असलेल्या ‘रेड ओक स्पा-2’ या सेंटरवर भाग्यनगर पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून चार महिलांची सुटका केली. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचा नांदेड दक्षिण युवासेना जिल्हाध्यक्ष अमोदसिंग साबळे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, साबळे व मॅनेजर मनोज जांगिड हे दोघे फरार आहेत.



स्पा सेंटरच्या आडून वेश्या व्यवसाय
कॅनल रोडवरील स्पा सेंटरमध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी २ ऑगस्ट रोजी अचानक छापा टाकला. तपासात उघडकीस आले की, सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना अश्लील सेवा पुरवली जात होती. यामध्ये महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करण्यात येत होते.

अटक व गुन्हा दाखल
पोलिसांनी नागसेन गायकवाड, संतोष इंगळे, रोहन गायकवाड यांना अटक केली असून, स्पा सेंटरचा मालक अमोदसिंग साबळे आणि मॅनेजर मनोज जांगिड फरार आहेत. या ठिकाणाहून पोलिसांनी १६,५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, चार महिलांची सुटका करण्यात आली आहे.

गुन्हा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत
या प्रकरणी गुन्हा क्रमांक ४४५/२०२५ नोंदवून कलम ३, ४, ५(१)(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ
शिवसेनेचा स्थानिक पदाधिकारीच अनैतिक धंद्यात गुंतल्याचे स्पष्ट झाल्याने नांदेडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. स्पा सेंटरसारख्या व्यवसायाच्या आडून असा गुन्हा उघडकीस येणं, हे प्रशासनासाठी तसेच पक्षासाठीही मोठे धक्का मानले जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!