WhatsApp

IAS तुकाराम मुंढेंची धडाकेबाज बदली; दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदाची नवी जबाबदारी

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य प्रशासनात ठोस निर्णयक्षमतेसाठी ओळखले जाणारे आणि चर्चेत राहणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासह आणखी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्या शासनाने जाहीर केल्या आहेत. मुंढेंना असंघटित कामगार आयुक्तपदावरून बदली करून राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.



तुकाराम मुंढेंना नवी भूमिका
राज्यसेवेतील 2005 बॅचचे अधिकारी असलेले तुकाराम मुंढे हे याआधी विविध पदांवर कार्यरत राहिले असून, त्यांची कामकाजातील कडक शिस्त आणि तडफदार शैली अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. आता त्यांच्याकडे दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही नियुक्ती मंत्रालय, मुंबई येथे लागू होणार आहे.

चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्याही जाहीर
राज्य शासनाने केलेल्या बदल्यांमध्ये आणखी चार आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नितीन पाटील यांना राज्य कर विभागात विशेष आयुक्तपद
2007 बॅचचे नितीन पाटील यांची महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून बदली करून राज्य कर विभागात विशेष आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अभय महाजन यांची जागा अदलाबदल
विशेष आयुक्त (राज्य कर) पदावर कार्यरत असलेले अभय महाजन यांना आता कापूस उत्पादक महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

ओंकार पवार यांच्याकडे झेडपी नाशिकची जबाबदारी
2022 बॅचचे ओंकार पवार यांची सहाय्यक जिल्हाधिकारी (इगतपुरी, नाशिक) पदावरून बदली होऊन त्यांच्यावर जिल्हा परिषद, नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद सोपवण्यात आले आहे.

आशा पठाण यांना ‘वनमती’च्या महासंचालकपदाची जबाबदारी
मुख्यमंत्री सचिवालय (नागपूर) येथील सहसचिव आशा अफजल खान पठाण यांची नियुक्ती वनमती, नागपूरच्या महासंचालक म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आधीचे सहसचिव पदही राहणार आहे. या बदल्यांमुळे राज्य प्रशासनातील कार्यपद्धतीत काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः मुंढेंसारख्या कर्तबगार अधिकाऱ्यांच्या नव्या खात्यातील कामकाजाची वाटचाल आता अधिक बारकाईने पाहिली जाणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!