अकोला न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : न्यायासाठी लढणाऱ्या एका घटस्फोटप्राप्त महिलेला प्रेमाचं आमिष दाखवत, शरीरसंबंध ठेवून मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या एका वकिलाचा प्रकार समोर आला आहे. पीडितेच्या आजारपणातसुद्धा जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्याचा आरोप असून, दोन वेळा गर्भपात घडवून आणल्याची माहिती तिने पोलिसांना दिली आहे. विशेष म्हणजे लग्नाचा आग्रह करताच वकिलाने तिला गाडीखाली टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयीन ओळख ते फसवणुकीपर्यंतचा प्रवास
२०१८ मध्ये पीडित महिलेचं लग्न झालं होतं. पतीसोबत मतभेद झाल्याने कौटुंबिक न्यायालयात प्रकरण सुरू होतं. याचदरम्यान वकील महेंद्र भगवान नैनाव (वय ३४) याची तिच्याशी ओळख झाली. मोबाईलवरून संवाद सुरू झाला आणि त्यातून मैत्रीचं रूपांतर प्रेमसंबंधात झालं. आरोपीने लग्नाचं आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
हॉटेलपासून भाड्याच्या खोलीपर्यंत सहवास
८ मार्च ते १२ जून दरम्यान आरोपीने पीडित महिलेला शहरातील हॉटेलमध्ये नेऊन शरीरसंबंध ठेवले. नंतर ‘तुझं एलएलबी पूर्ण होईपर्यंत आपण एकत्र राहू’ असं सांगत एक भाड्याची खोली घेतली आणि दोघं तिथे राहू लागले. या कालावधीत पीडिता दोन वेळा गर्भवती राहिली आणि दोन्ही वेळा आरोपीने तिचा गर्भपात घडवून आणला.
लग्नासाठी आग्रह करताच धमकी आणि छळ
लग्नाच्या मागणीवरून वकिलाचा चेहरा बदलला. पीडितेच्या आजारपणातही जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यात आले. नंतर तिच्यावर शारीरिक मारहाण सुरू झाली. ३ ऑगस्ट रोजी आरोपीने गाडीने उडवण्याची धमकी दिली, त्यामुळे पीडित महिला थेट पोलीस ठाण्यात गेली. तिच्या तक्रारीनंतर बलात्कार व छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची तातडीने कारवाई सुरू
सिडको पोलिसांनी तक्रार नोंदवून महेंद्र नैनाव याच्याविरोधात बलात्कार, मारहाण, धमकी आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप नोंदवले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.