अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात राज्यातील गरीबांना 100 रुपयांत मिळणारा ‘आनंदाचा शिधा’ योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी लागणाऱ्या 45 हजार कोटी रुपयांच्या मोठ्या खर्चामुळे इतर योजनांवर परिणाम होऊ लागला असल्याची थेट कबुलीही त्यांनी दिली.
‘आनंदाचा शिधा’ रद्द, कारण लाडकी बहीण योजना
भुजबळ म्हणाले, “लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आवश्यक आहे. त्यामुळे ‘आनंदाचा शिधा’ योजनेसाठी सध्या टेंडर प्रक्रिया सुरू करणं शक्य नाही. यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही.”
शिधा टेंडरसाठी वेळ नाही
शिधा वाटपासाठी दोन ते तीन महिने आधी टेंडर प्रक्रिया व्हावी लागते. सध्या ही प्रक्रिया सुरू करण्यास वेळ नाही, असं स्पष्ट करत भुजबळ यांनी योजनेच्या स्थगितीला दुजोरा दिला. आनंदाचा शिधा योजना वर्षाला सुमारे 550 कोटी रुपये खर्चाची असून यासाठीचा निधीही सध्या अपुरा आहे.
शंभर रुपयांत चार वस्तू मिळायच्या
या योजनेअंतर्गत रेशन कार्डधारकांना एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणा डाळ आणि एक लिटर पामतेल अशा चार वस्तू 100 रुपयांत दिल्या जात होत्या. दिवाळी, गुढीपाडवा, गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारख्या सणांच्या निमित्ताने या किट्स वाटल्या जात होत्या.
शिवभोजन थाळी योजना पण अडचणीत
फक्त आनंदाचा शिधाच नव्हे तर शिवभोजन थाळी योजनाही संकटात सापडली आहे. या योजनेसाठी दरवर्षी 140 कोटी रुपयांची आवश्यकता असते. मात्र सध्या केवळ 20 कोटींचा निधी दिला गेला असल्याने अंमलबजावणीत अडथळे निर्माण झाले आहेत.
राजकोषावर मोठा ताण
भुजबळ म्हणाले, “लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे काही योजना थांबवाव्या लागतील. तरीही, आम्ही उत्पन्नवाढीवर काम करत आहोत. निधी उपलब्ध झाल्यानंतर योजना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल.”
राज्य सरकारच्या निर्णयामुळे गणेशोत्सवात गरीबांना मिळणाऱ्या सवलतीवर विरजण पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून पुढील आर्थिक धोरणांकडे जनतेचं लक्ष लागलं आहे.