अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे एकीकडे डिजिटल क्रांती होत असताना, दुसरीकडे शहरी व ग्रामीण भागातील तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन जुगाराचं व्यसन झपाट्यानं वाढताना दिसत आहे. अँड्रॉइड मोबाईलमधील गेमिंग अॅप्सच्या नावाखाली सुरू असलेल्या या ऑनलाईन जुगारामुळे युवकांचे शिक्षण, पैसा आणि आयुष्य धोक्यात येत आहे.
मोबाईल अॅप्सवरून सर्रास सुरू असलेला जुगार
आजकाल विविध गेमिंग अॅप्स गेमच्या नावाखाली थेट जुगार खेळायला प्रवृत्त करत आहेत. यामध्ये नाव, बँक तपशील, मोबाईल नंबर भरून ओटीपीद्वारे बँक खातं अॅपशी जोडलं जातं. सुरुवातीला आकर्षक बोनस देत पैसेही खात्यात पाठवले जातात आणि मग सुरू होतो घरबसल्या जुगाराचा प्रवास.
दिवसेंदिवस वाढती संख्या
या अॅप्सच्या आहारी गेलेल्या युवकांची संख्या वेगाने वाढते आहे. या अॅप्समध्ये पैसे जमा करणे, विड्रॉल करणे, आणि ‘बेट’ लावण्याचे पर्याय असतात. काही वेळेस नशिबाने काही रक्कम जिंकली गेली तरी शेवटी बहुतेक युवक आर्थिकदृष्ट्या कंगाल होतात.
कोविड काळात मिळालेला मोबाईल ठरतोय ‘गॅम्बलिंग मशीन’
कोविड काळात ऑनलाइन शिक्षणासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना स्मार्टफोन उपलब्ध करून दिला. परंतु याच मोबाईलचा गैरवापर होऊन अनेक विद्यार्थी ऑनलाइन गेमिंगच्या आहारी गेले. शिक्षणाऐवजी गेम, गेममधून जुगार, आणि जुगारातून नुकसान हे चित्र सध्या घरोघरी दिसून येत आहे.
आकर्षक बोनसची लालसा
ऑनलाईन अॅप्सवर ‘पहिलं बेट फ्री’, ‘१०० टाका टाका, २०० मिळवा’ यांसारख्या ऑफर्स देत युवकांना आकर्षित केलं जातं. विशेषतः महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थी सहज या जाळ्यात अडकतात. या अॅप्सचा प्रसार गावखेड्यांतही झाल्यामुळे धोका ग्रामीण भागातही वाढत चालला आहे.
पालक आणि पोलिसांची जबाबदारी वाढली
या अॅप्समुळे युवक फसवणुकीचा बळी ठरत असून, अनेक घरं उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांच्या स्मार्टफोनच्या वापरावर लक्ष ठेवणं अत्यावश्यक आहे. याशिवाय पोलीस प्रशासनाने अशा अॅप्सवर कठोर कारवाई करून त्यांना आळा घालण्याची गरज आहे.