WhatsApp

‘पेटा’चा नवा झटका! हत्तींवरून तीन मठांना नोटिसा

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नागपूर : महादेवी हत्तीण प्रकरणानंतर ‘पेटा इंडिया’नं आता आणखी तीन मठांवर लक्ष केंद्रित करत बेळगाव जिल्ह्यातील शेडबाळ, अकलनूर आणि बिचले येथील मठांना नोटिसा पाठवल्या आहेत. हत्तींवर होणाऱ्या वागणुकीबाबत सविस्तर माहिती आणि अहवाल मागवण्यात आला असून हत्तींच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे.



हत्तींच्या आरोग्याची विचारणा
या नोटिशीमध्ये हत्तींचं अन्न, पाणी, निवारा, वैद्यकीय सुविधा तसेच दैनंदिन काळजी याबाबत सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे. महादेवी हत्तीणप्रमाणेच इतर मठांतील हत्तींवरही दुर्लक्ष होत असल्याचा संशय ‘पेटा’नं व्यक्त केला आहे.

‘वनतारा’च्या संदर्भाने संशय अधिक गडद
महादेवी हत्तीणबाबत सुरू असलेल्या वादात ‘वनतारा’ संस्थेचं नाव पुढे आलं होतं. त्यामुळे ‘पेटा’च्या या ताज्या नोटिसा आणि ‘वनतारा’च्या कार्यप्रणाली यांचा काही संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामागे कोणतीही सुसंगती आहे का यावर सध्या चर्चा सुरू आहे.

किरण माने यांच्या पोस्टमुळे खळबळ
या घडामोडीवर अभिनेते किरण माने यांनी दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर भाष्य करत तीन मठांवर कारवाई होणार असल्याचा इशारा दिला होता. त्यांच्या पोस्टला मराठी वृत्तवाहिन्यांच्या वृत्तांनंतर दुजोरा मिळाला असून सोशल मीडियावर यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे.

‘पेटा’वर सोशल मीडियावर ट्रोलिंगचा भडिमार
या कृतीनंतर ‘पेटा’वर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. विशेषतः धार्मिक स्थळांना लक्ष करत असल्याचा आरोप करत अनेकांनी ‘पेटा’ला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. त्यात धर्म आणि परंपरांमध्ये हस्तक्षेप केला जात असल्याचा सूरही दिसून येतो आहे.

‘पेटा’ची भूमिका आणि भारतातील अस्तित्व
‘पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स’ ही जागतिक संस्था असून भारतात ‘पेटा इंडिया’च्या माध्यमातून कार्यरत आहे. मुंबई हे त्यांचं मुख्यालय असून प्राण्यांवरील क्रूरतेविरोधात कार्यरत राहणं हेच त्यांचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं सांगितलं जातं.

Leave a Comment

error: Content is protected !!