अकोला न्यूज नेटवर्क
लातूर : औसा तालुक्यातील हसेगाव येथील सेवालय प्रकल्पात दाखल असलेल्या एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संस्थेतीलच एका कर्मचाऱ्याने पीडितेवर बलात्कार केला असून ती चार महिन्यांची गर्भवती राहिली. पीडित मुलीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले आहे.
एचआयव्ही संक्रमित मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्याने उघड झाली घटना
हसेगावमधील सेवालयात एचआयव्ही बाधित अनाथ मुलांचा सांभाळ केला जातो. याच संस्थेतील कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचं निष्पन्न झालं आहे. मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खाजगी रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला.
संस्थाचालक, कर्मचारी व इतरांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, संस्थेचे प्रमुख व कर्मचारी तसंच अन्य सहा जणांनी तिला मदत न करता धमकावल्याचं आरोपपत्रात नमूद आहे. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल असून चौघांना अटक करण्यात आली आहे.
संस्थेच्या प्रमुखांचा दावा : हे षड्यंत्र आहे
सेवालयाचे प्रमुख रवी बापटले यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. “पीडित मुलगी मागील चार महिन्यांपासून सेवालयात नव्हती. संबंधित कर्मचारी सेवालय सोडून गेला आहे. ही बदनामी करण्यासाठी रचलेली योजना आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
दुसऱ्या घटनेतही अल्पवयीन मुलगी गर्भवती
दरम्यान, रायगड जिल्ह्यातही एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अलिबाग तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे नातेवाईकाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. वेळोवेळी झालेल्या शरीरसंबंधातून ती वीस आठवड्यांची गर्भवती राहिली. या प्रकरणातही कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.