अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई | मुंबईत एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक गुन्हा उघडकीस आला आहे. एका 40 वर्षीय नराधमाने आपल्या पत्नीसमोरच तिच्या अल्पवयीन बहिणीवर सातत्याने बलात्कार करून तिला गर्भवती केलं. या घटनेत त्याची पत्नीही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
मार्चपासून सुरू होता अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी, तिची मोठी बहीण आणि भाऊजी हे तिघंही एकाच घरात राहत होते. पीडितेच्या जबाबानुसार, मार्च 2024 पासून जुलै 2025 पर्यंत भाऊजीने अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला. गर्भधारणा झाल्यानंतर जेव्हा तिने हा प्रकार बहिणीला सांगितला, तेव्हा तिने तिला ‘शांत राहा’ असं सांगून विषय दाबण्याचा प्रयत्न केला.
डॉक्टरांपासून दूर, घरातच प्रसूती
मुलीची वाढती प्रकृती लपवण्यासाठी मोठ्या बहिणीने तिला वैद्यकीय तपासणीला कधीही नेले नाही. उलट, घरातच तिची प्रसूती केली. मात्र, प्रसूतीनंतर तब्येत बिघडल्याने तरुणीला तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथूनच पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.
दोघांना अटक, पोक्सो अंतर्गत गुन्हा
पोलिसांनी आरोपी पती व पत्नीला अटक केली असून, पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलेला गुन्हा लपवणे, पुरावे नष्ट करणे आणि पीडितेवर दबाव टाकणे या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे.

पीडित व नवजात बाळ स्थिर
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी व तिचं बाळ दोघंही सध्या स्थिर असून उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून पुढील तपास गतीने सुरू आहे. मुलीच्या जबाबांसह वैद्यकीय अहवाल, घरातील परिस्थिती आणि इतर पुरावे गोळा केले जात आहेत.