WhatsApp

शेतकरी आंदोलनात नवा रंग! ६ ऑगस्टला बच्चू कडू-राज ठाकरे भेट; मनसेकडून खुला पाठिंबा

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई :
मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शेतकरी प्रश्नावर संघर्षशील भुमिका घेतलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यात ६ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून अन्य मागण्यांपर्यंतचा विषय या बैठकीत केंद्रस्थानी राहणार आहे.



शेतकरी आंदोलनाला मनसेकडून सक्रिय पाठिंबा
बच्चू कडू यांनी मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जनआंदोलन छेडले आहे. विशेषतः, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या वचनाची पूर्तता न झाल्यामुळे सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या आंदोलनात मनसे नेते बाळा नांदगावकर देखील सहभागी झाले होते. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते, “पैसे कुठूनही आणा, पण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.” राज ठाकरे यांनी केवळ आंदोलनाला पाठिंबा न देता, आपल्या नेत्यांना प्रत्यक्ष सहभागी व्हा असा आदेश दिला होता. त्यामुळे मनसे आता या मुद्द्यावर अधिक ठोस भुमिका घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

राज ठाकरे शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेतही आक्रमक
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यक्रमात हजेरी लावत मराठी शेतकऱ्यांना उद्योगात भागीदारी, शेतजमिनी विकू नका, असे आवाहन केले होते. त्यांनी लाल झेंड्याच्या व्यासपीठावर भगवे झेंडे आणत एका नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात केली होती. राज यांच्या भूमिकेमुळे सध्या कृषी, मराठी रोजगार व अस्मिता या त्रिसूत्रीवर राजकीय वर्तुळात नवा विचारमंथन सुरू झाल्याचे दिसत आहे. बच्चू कडू यांची भेट ही केवळ आंदोलनासाठी नसून, आगामी निवडणुकीसाठी संभाव्य राजकीय आघाडीचा देखील संकेत असू शकतो.

Leave a Comment

error: Content is protected !!