अकोला न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नांदणी मठातून हलवलेली हत्तीण ‘महादेवी’ सुरक्षित असून तिची प्रकृती सुधारत आहे, असे वनतारा पशुसंग्रहालयाने स्पष्ट केले आहे. मात्र दुसरीकडे कोल्हापुरात हजारो नागरिकांनी तिच्या पुनरागमनासाठी पदयात्रा काढत संताप व्यक्त केला. आंदोलकांच्या मते, धार्मिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असलेली ही हत्तीण परत आलीच पाहिजे.
▪ हत्तीण का हलवली?
महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण गंभीर आजारी असून तिला सांधेदुखी, गँगरीनसारखे त्रास आहेत. नांदणी मठात तिला धातुसदृश्य जमिनीवर ठेवले जात होते. या पार्श्वभूमीवर ‘पेटा इंडिया’च्या तक्रारीवर मुख्य वन्यजीव अधिकाऱ्यांनी समिती गठित केली होती.
▪ न्यायालयीन आदेश काय होते?
मुंबई उच्च न्यायालयाने १६ जुलै रोजी महादेवीला जामनगर येथील वनतारामध्ये हलवण्याचा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाने २९ जुलैला त्या आदेशास दुजोरा दिला आणि धार्मिक कार्यात वापर होणाऱ्या हत्तीला सन्मानपूर्वक पुनर्वसन देण्याचा आदेश दिला.
▪ वनताराची भूमिका काय?
महादेवीला सुरक्षित आणि नैसर्गिक वातावरणात ठेवले असून जलचिकित्सा, फिजिओथेरपी, रेडिओलॉजिकल चाचण्या सुरू आहेत. ती इतर हत्तींसोबत राहते. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व वन्यजीव कायद्याचे पालन करत वैद्यकीय देखरेखीत हत्तीण परत पाठवण्यास तयार असल्याचे वनताराने म्हटले.
रविवारी हजारो लोकांनी नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. ‘माधुरी परत करा’, ‘जिओ बहिष्कार’ अशा टोप्या घालून नागरिकांनी घोषणा दिल्या. राजू शेट्टींसह अनेक आमदार व माजी आमदार सहभागी झाले.
हत्तीण धार्मिक परंपरेचा भाग आहे. त्यामुळे तिच्या जागी यांत्रिक प्रतिमा वापरण्याची वनताराची सूचना, अनेकांना भावनिकदृष्ट्या अमान्य आहे. राजू शेट्टींनी ‘रिलायन्स मॉल’वरही बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. वनतारा केंद्र बेकायदा असल्याचा आरोपही त्यांनी केला.