अकोला न्यूज नेटवर्क
पुणे : संभाजीनगर पोलिसांनी पुण्यात तपासासाठी आले असताना तीन तरुणींवर जातिवाचक शिवीगाळ करत अपमानास्पद वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकाराचा व्हिडिओ संबंधित तरुणींनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट गृहमंत्र्यांकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
घटना कोथरूड परिसरातील असून, संभाजीनगरमधील एका विवाहित तरुणीने सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात राहणाऱ्या आपल्या मैत्रिणीच्या मदतीने फ्लॅटमध्ये वास्तव्यास सुरुवात केली होती. तिच्या सासरच्यांनी तिच्या बेपत्ताची तक्रार संभाजीनगर पोलिसांकडे दिली. तांत्रिक तपासातून ही तरुणी पुण्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित पोलिस पथक पुण्यात दाखल झाले.
पोलिसांनी या तरुणीचा शोध घेत कोथरूडमधील तिच्या मैत्रिणींच्या घरात धाव घेतली. त्यावेळी संबंधित विवाहित तरुणी घरी नसल्याचे समजूनही, पोलिसांनी तिथे राहणाऱ्या तीन तरुणींना जबरदस्तीने चौकशीसाठी थांबवले. त्यांना अर्वाच्य आणि जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी घरात घुसून कपडे चेक करण्यासारखे कृती केली, असेही तरुणीने व्हिडिओत म्हटले आहे.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, अशा वर्तनाबाबत संबंधित पोलिसांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गृहमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावे आणि आरोपी पोलिसांवर कठोर कारवाई करावी, असे वक्तव्य केले आहे.