WhatsApp

सेल्फी आणि स्टंटच्या नादात अपघाताला आमंत्रण; सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक

Share

अकोला न्यूज नेटवर्क
सातारा :
फ्रेंडशिप डेच्या दिवशी तरुणाईने मैत्रीचा उत्सव साजरा करताना जीव धोक्यात घालणारा थरार घडवून आणला. पुणे-बंगळूर महामार्गावर भरधाव कारमधून खिडक्या व सनरूफमधून बाहेर लटकत स्टंट करणाऱ्या युवक-युवतींचा एक धक्कादायक व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकारामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, पोलिसांसमोर संबंधितांची ओळख पटवण्याचं आणि कारवाईचं आव्हान उभं राहिलं आहे.



रविवारी सकाळी सुमारास भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत, पाचवड ते वेळे दरम्यान ही घटना घडली. सुट्टीचा दिवस आणि फ्रेंडशिप डेचा उत्साह यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक होती. याच वेळी एक कार वेगाने जाताना दिसली. कारच्या दोन्ही बाजूच्या खिडक्यांतून दोन तरुण बाहेर लटकले होते, तर सनरूफमधून एक तरुण व एक तरुणी उभे राहून मैत्रीचे ‘सेलिब्रेशन’ करत होते.

अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या लटकलेल्या तरुणांनीच सनरूफमधील युगुलांचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीत करत होते. या प्रकारामुळे आजूबाजूच्या वाहनचालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली. एका क्षणाची चूकही मोठा अपघात घडवू शकली असती. संपूर्ण प्रकार एका सजग नागरिकाने मोबाईलमध्ये कैद केला आणि त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या बेफिकीर वर्तनावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. केवळ व्ह्यूज आणि लाईक्सच्या नादात जीवाशी खेळणं अशक्यपणे बेजबाबदार कृत्य आहे, असं मत अनेकांनी व्यक्त केलं. याप्रकरणी संबंधित तरुणांवर तत्काळ आणि कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, भुईंज पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!