WhatsApp

सावत्र आईचा अमानुष निर्णय; शाळेत न गेलेल्या मुलीचा गळा आवळून खून

Share

अकोला न्यूज नेटवर्क
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील नागनाना स्टॉपजवळ एक थरारक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. केवळ जेवण करत नव्हती आणि शाळेत नियमित जात नव्हती या कारणावरून एका तीन वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप तिच्या सावत्र आईवर करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्ती नागेश कोकणे या तीन वर्षांच्या मुलीचा खून तिच्या सावत्र आईने केल्याचा आरोप आहे. संबंधित महिला आपल्या नवऱ्याच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या कीर्ती व आकृती या दोन मुली आणि नवऱ्यासह राहत होती. मात्र ती दोन्ही मुलींचा सातत्याने छळ करायची. वेळेवर जेवण न देणे, चटके देणे, मारहाण करणे, अशी अमानुष वागणूक दिली जात होती.

अखेर तीव्र रागाच्या भरात कीर्ती जेवत नव्हती आणि शाळेतही जात नव्हती, या कारणावरून सावत्र आईने तिचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलप यांनी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे करत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात अलिकडच्या काळात बालहत्येच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अरण (ता. माढा) येथे नातेसंबंध उघडकीस येऊ नये म्हणून दहा वर्षांच्या मुलाचा खून करण्यात आला होता. मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे प्रियकरासोबत संबंध ठेवण्यासाठी एका विवाहितेने मनोरुग्ण महिलेला मारून तिचा चेहरा दुसऱ्याप्रमाणे सादर केला होता. हे सर्व प्रकार पोलिसांनी वेळेवर उघडकीस आणले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!