अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठी भाषेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “मराठीसाठी हिंसक झालो, तर काय उखडायचं ते उखडा,” असं थेट आव्हान देतानाच त्यांनी काल रायगडमधील राज ठाकरे यांच्या भाषणाचाही दाखला दिला.
संजय राऊत म्हणाले, “हा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस, हे राज्य मराठी माणसाचं आहे. आमच्या १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिलंय. तुम्ही नाही. तुम्ही राज्याचे तुकडे करणारे आहात. तुमचं मुख्यमंत्रीपद गेल्यावर तुम्ही वेगळा विदर्भ मागणार, हे आम्हाला माहीत आहे.” मराठीसाठी आक्रमक होण्याची वेळ आली तर आम्ही होऊच, असा इशाराही त्यांनी दिला.
राऊत पुढे म्हणाले की, “तुम्ही मोरारजी देसाई होणार आहात का? मराठीचा आग्रह धरला म्हणून गोळ्या घालणार का? आधी तुमच्या गुजरातमध्ये हिंदी सक्ती करा, मग महाराष्ट्रात या. आम्ही गुजरातला जाऊन मराठी लादलेली नाही.”
याचवेळी राज ठाकरेंच्या भाषणातील काही मुद्द्यांवरही त्यांनी दुजोरा दिला. राज ठाकरे यांनी गुजरातमधील अल्पेश ठाकूरने उत्तर भारतीयांना हाकलल्याची आठवण करून दिली होती. त्याला भाजपाने आमदार केल्याचा मुद्दा राऊतांनी अधोरेखित केला. “त्यांनी म्हटलं, मी आधी गुजराती आहे. आम्हीही मग म्हणतो, आम्ही आधी मराठी आहोत,” असा टोकाचा सूर राऊतांनी लावला.
त्याचप्रमाणे, ‘५० खोके, एकदम ओके’ घोषणा देणाऱ्या आमदार कैलास गोरंट्याल यांना भाजपाने पक्षात घेतल्याची आठवण राऊतांनी करून दिली. “ही सरकार खोक्यातूनच उभी राहिली आहे,” असा घणाघातही त्यांनी केला.