अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाला तब्बल २१ महिने उलटून गेले तरीही प्रमुख आरोपी मोकाट आहेत. आता या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी देशाबाहेर जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमावरून दिली असून, पोलिसांना तत्काळ पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.
२१ ऑक्टोबर २०२३ रोजी महादेव मुंडे यांची सार्वजनिक ठिकाणी निर्घृण हत्या झाली होती. त्यानंतर मुंडे कुटुंबीयांनी सातत्याने विविध पातळ्यांवर न्यायासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. नुकतीच महादेव मुंडे यांच्या पत्नीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी SIT मार्फत चौकशीचे आश्वासन दिले होते.
मात्र, रोहित पवार यांनी आज पोस्ट करून महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी म्हटले, “मुख्य आरोपी देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत असून पोलिसांनी यावर त्वरित कारवाई करावी. SIT मध्ये संतोष साबळे यांचा अद्याप समावेश नाही. तपास गतीमान होण्यासाठी हे आवश्यक आहे.”
या प्रकरणात सुरुवातीपासूनच विविध राजकीय नेत्यांनी लक्ष घातले आहे. आमदार सुरेश धस, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर यांनी मुंडे कुटुंबीयांची भेट घेतली असून, मनोज जरांगे पाटील यांनीसुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाशी थेट संवाद साधला होता.
दरम्यान, पाटोदा येथील बाळा बांगर, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठा आंदोलकही या लढ्यात सहभागी झाले आहेत. राज्य सरकारने SIT तयार केली असली तरी अजूनही अपेक्षित कारवाई झाली नसल्याची भावना कुटुंबीयांमध्ये आहे.