अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणात फरार असलेल्या मुख्य आरोपीने थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकावणारी नऊ मिनिटांची चित्रफीत पाठवली असून, त्यातून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या धमकीनंतरही आव्हाड यांनी पोलिसांत तक्रार दिली नसली, तरी त्यांनी “मी अशा धमक्यांना घाबरत नाही” असा ठाम पवित्रा घेतला आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी गोट्या गीते याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असून तो अद्याप फरार आहे. आव्हाड यांनी या हत्येचा सातत्याने पाठपुरावा करत राज्य शासनाला आणि पोलिस प्रशासनाला प्रश्न विचारले होते. याच रागातून गोट्या गीतेने ही धमकी दिल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओत आरोपीने थेट बंदूक दाखवत धमकावले आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले, “मी वंजारी असल्याचा मुद्दा काढून सहानुभूती मिळवण्याचा कोणताही हेतू नाही. गुन्हेगाराला जात-धर्म नसतो. मकोकाचा आरोपी जर माझ्या घराची रेकी करत असेल आणि पोलिसांना त्याचा पत्ता लागत नसेल, तर तक्रार दाखल करून काही उपयोग नाही.”
दरम्यान, पक्षाचे राज्य सरचिटणीस रोहित पवार यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. “फरार गुंड इतकी धमकी देऊ शकतो, म्हणजे पोलिसांचा काय उपयोग? गृहमंत्री याचे उत्तर द्यावे,” असे ट्विट करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
महादेव मुंडे यांची २० ऑक्टोबर २०२३ रोजी तहसील कार्यालयासमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला २१ महिने लोटूनही मुख्य आरोपी फरार आहे. पीडित कुटुंबीयांनी नुकतीच आव्हाड यांची भेट घेऊन न्यायासाठी अधिक सक्रिय भूमिका घेण्याची विनंती केली होती.