अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतलेली स्वतंत्र भेट आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून आलेल्या सूचक विधानामुळे सप्टेंबरमध्ये काही मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. “सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घटना घडतील,” असं विधान करून उद्धव ठाकरे गटाने नवा राजकीय रोख तयार केला आहे.
दिल्ली दौऱ्यावर निघालेले उद्धव ठाकरे गांधी कुटुंबीयांची भेट घेणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला, राष्ट्रपतींसोबत पंतप्रधान आणि गृहमंत्र्याच्या चर्चेने अनेक राजकीय शक्यता वाढवल्या आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान किंवा त्यानंतर काही मोठे निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा सध्या दिल्लीत सुरू आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातही वातावरण तापू लागले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा ‘चलो मुंबई’चा नारा दिला असून, २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोठा मोर्चा होणार आहे. दुसरीकडे, मुंबईतील रंगशारदा सभागृहात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा होत असून, राज ठाकरे यांचं भाषण अपेक्षेप्रमाणे राजकीय संकेतांनी भरलेलं असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अविमुक्तेश्वरानंद यांनी “हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला तेव्हा महाराष्ट्र अस्तित्वात नव्हता” असे वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावर मराठीप्रेमी आणि राजकीय नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.
राजकीय राजकारण, भाषिक अस्मिता आणि सामाजिक आंदोलन अशा अनेक पातळ्यांवर महाराष्ट्र-देशातील घडामोडी सध्या गतिमान असून, यांचा परस्पर परिणाम आगामी निवडणुकांवर पडणार हे निश्चित.