अकोला न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील पडेगाव परिसरात शनिवारी रात्री एकच्या सुमारास एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना घडली. झोपेत असलेल्या रिक्षाचालक पतीचा गळा आवळून आणि उशीने तोंड दाबून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पतीने प्रतिकार करत आरडाओरड केली आणि घरमालक दरवाज्यात आल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. प्रियकर नागरिकांच्या हाती लागून चोप खाऊन पोलिसांच्या ताब्यात गेला, तर पत्नी मुलांना घेऊन फरार झाली.
छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी विवेक जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक सचिन (नाव बदलले आहे, वय ४२) हे पडेगावात पत्नी आणि दोन मुलांसह भाड्याने राहत होते. शनिवारी रात्री ते कामावरून घरी आल्यानंतर जेवून मुलांसोबत झोपले होते. दरम्यान, पत्नी रेखा (नाव बदलले आहे) यांनी त्यांच्या प्रियकर राजू भानुदास खैरे (रा. पैठण खेडा) याला घरात बोलावले.
झोपलेल्या पतीचा ओढणीने गळा आवळून आणि उशीने तोंड दाबून दोघांनी मिळून खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र पती जागा झाल्याने आणि जोरात आरडाओरड केल्याने घरमालक दरवाज्यावर येताच आरोपी पत्नी दार उघडून पळाली. सचिन यांनी मात्र प्रियकराला पकडून ठेवले. आवाज ऐकून स्थानिक नागरिक गोळा झाले आणि आरोपीस चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.
तपासात समोर आले की, दोघांचे प्रेमप्रकरण एका कंपनीत काम करताना सुरू झाले होते. दोघेही विवाहित असून मुलांसह संसार करत होते. पती त्यांच्या नात्याच्या आड येतो म्हणून त्याला हटवण्याचा कट रचण्यात आला होता. विशेष म्हणजे, मुलांना आधीच रिक्षात बसवून ठेवण्यात आले होते, जेणेकरून खून करून दोघेही सहज पळून जाऊ शकतील. मात्र हा कट घरमालकामुळे उधळला गेला.
पोलिसांनी आरोपी राजूला अटक केली असून पत्नीचा शोध सुरू आहे. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.