वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय व व्हाईट हाऊसचे माजी डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ स्टीफन मिलर यांनी भारतावर गंभीर आरोप करत खळबळ उडवली आहे. त्यांनी म्हटले की, भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करत असून त्यामुळे अप्रत्यक्षपणे रशियाच्या युक्रेनवरील युद्धासाठी आर्थिक मदत (फंडिंग) करत आहे.
मिलर म्हणाले, “ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की जर भारताने रशियाकडून तेल खरेदी करत राहिले, तर हे स्वीकारार्ह ठरणार नाही. युद्ध थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करत असताना, आपल्या भागीदारांनीही वास्तववादी भूमिका घ्यावी.”
अमेरिका सध्या भारतावर दबाव वाढवत आहे की, त्यांनी मॉस्कोबरोबरचा व्यापार कमी करावा. त्यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून टॅरिफ (आयात शुल्क) वाढवण्याचा इशारा दिला गेला आहे. इंडो-पॅसिफिक भागात भारत हा अमेरिका आणि पाश्चात्त्य राष्ट्रांचा महत्त्वाचा सहयोगी असूनही तेलखरेदीमुळे दोघांत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
मिलर पुढे म्हणाले, “ट्रम्प आणि मोदी यांच्यात सख्य आहे, मात्र ते व्यक्तिगत नाही तर धोरणात्मक पातळीवर असावं लागेल. रशियाशी असलेल्या भारताच्या व्यापाराचा आता पुनर्विचार व्हायला हवा.”
भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली, तर त्याचा थेट परिणाम देशाच्या आर्थिक स्थितीवर होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. भारताला त्यासाठी इतर देशांकडून कच्चं तेल खरेदी करावं लागेल, ज्याचा खर्च ९ ते ११ अब्ज डॉलरपर्यंत वाढू शकतो. सध्या भारत हा चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा तेल आयातदार आहे आणि रशियाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. युद्धानंतर रशियाने भारताला स्वस्त दरात तेल पुरवण्यास सुरुवात केली असून, भारताची रशियाकडून तेल खरेदी ०.२ टक्क्यांवरून तब्बल ३५–४० टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
अशा परिस्थितीत भारताच्या परराष्ट्र धोरणावर आणि जागतिक संबंधांवर याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.