अकोला न्यूज नेटवर्क
ओव्हल : भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत आपल्या नावावर एक अनोखा विक्रम जमा केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत दुसऱ्या डावात शतक झळकावत त्याने केवळ सामना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, तर सलग दोन परदेश दौऱ्यांमध्ये ३०० हून अधिक धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
जयस्वालने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटींमध्ये ३९१ धावा केल्या होत्या. आता इंग्लंड दौऱ्यातही त्याने ३५० धावांचा टप्पा पार केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांसारख्या कठीण परिस्थितीतील दौऱ्यांमध्ये सलग ३०० हून अधिक धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला आहे.
पहिल्या डावात अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या डावात यशस्वीने जबरदस्त पुनरागमन करत शतक झळकावले. विशेष म्हणजे, यापूर्वी दुसऱ्या डावात तो मोठी खेळी करत नसल्याची टीका त्याच्यावर होत होती. मात्र या डावात त्याने ही टीका मोडून काढली. केएल राहुल आणि साई सुदर्शन अपयशी ठरल्यावर त्याने आकाश दीपसोबत भागीदारी करत भारतीय डाव सावरला.
या मालिकेत यशस्वीची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली आहे. सलामीवीर म्हणून त्याने संघाला भक्कम सुरुवात देण्याची जबाबदारी पार पाडली आहे. त्याची ही खेळी भारताला निर्णायक स्थितीत पोहोचवण्यात महत्त्वाची ठरली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सातत्य दाखवणाऱ्या या युवा खेळाडूकडून आता आगामी सामन्यांमध्ये अधिक अपेक्षा वाढल्या आहेत.