अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेसने राजधानीत आयोजित केलेल्या कायदेविषयक राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनावेळी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपविरोधात थेट आरोप करत खळबळ उडवली. विज्ञान भवनात झालेल्या या परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, कृषी कायद्यांविरोधात लढत असताना त्यांना धमकावण्यासाठी भाजपने तत्कालीन केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना पाठवले होते.
राहुल गांधी म्हणाले, “आम्ही कृषी कायद्यांवर आंदोलन करत होतो. त्याचवेळी मला धमकावण्यासाठी अरुण जेटली माझ्याकडे आले आणि म्हणाले की, सरकारविरोधात अशी भूमिका घेत राहिलात तर तुमच्यावर कारवाई होईल.” या वक्तव्यानंतर सभागृहात काही काळ शांतता पसरली होती.
पुढे ते म्हणाले, “जेटलींचं ते वक्तव्य ऐकून मी त्यांच्याकडे पाहिलं आणि उत्तर दिलं की, मला नाही वाटत तुम्हाला माहित आहे की तुम्ही कोणाशी बोलत आहात.”
कार्यक्रमात ‘देश का राजा कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’ अशा घोषणा देण्यात आल्या, त्यावर राहुल गांधी म्हणाले, “मी राजा नाही आणि मला राजा व्हायचंही नाही. मी राजा या संकल्पनेलाच विरोध करतो.”
राहुल गांधी यांनी यावेळी निवडणूक प्रक्रियेवरही संशय व्यक्त केला. ते म्हणाले की, २०१४ नंतरच्या निवडणुकांत काहीतरी गडबड आहे. “गुजरातमधील निकालांपासून माझा संशय सुरू झाला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातसारख्या राज्यांत एकही जागा जिंकता न येणं हे अकल्पनीय होतं,” असं त्यांनी सांगितलं. त्यांनी दावा केला की, लोकसभेनंतर अवघ्या चार महिन्यांत झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा साफ पराभव झाला, हेही संशयास्पद आहे.
या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.