अकोला न्यूज नेटवर्क
बंगळुरू : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि जनता दल (सेक्युलर) पक्षाचा माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा (वय ३४) याला बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष एमएलए/एमपी न्यायालयाने ही शिक्षा ठोठावत त्याला १० लाख रुपयांचा दंडही सुनावला. कालच त्याला एका पीडितेवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.
होलेनारसीपुरा (हसन, कर्नाटक) येथील गन्निकाडा फार्महाऊसवर २०२१ मध्ये एका ४८ वर्षीय कामगार महिलेवर दोनवेळा बलात्कार केल्याचा आरोप होता. आरोपीने आपले कृत्य मोबाईलमध्ये चित्रित केले होते. पीडितेच्या जबाबांवर, व्हिडीओ पुराव्यांवर आणि १२० साक्षीदारांच्या जबाबांवरून न्यायालयाने शिक्षा ठोठावली.
या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार ठरला तो प्रज्ज्वलचा माजी वाहनचालक कार्तिक एन. (३४). त्यानेच हे प्रकरण उघडकीस आणले. त्याने प्रज्ज्वलचा मोबाईल चोरून पाहिल्यानंतर कृत्याची माहिती मिळवली होती. कार्तिकने पुढे दावा केला की, आरोपीचे अश्लील व्हिडीओ त्याने भाजप नेते व वकील जी. देवराज गौडा यांना दिले. देवराज यांनी आरोप केला होता की, त्यांच्याकडे २९७६ अश्लील व्हिडीओ असून, त्यातील काहींमध्ये सरकारी महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या महिला ब्लॅकमेलिंगसाठी वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
प्रज्ज्वल रेवण्णावर एकूण चार बलात्कारप्रकरणे दाखल आहेत. विशेष तपास पथकाने (एसआयटी) हे प्रकरण हाती घेत तपास करत २०२२ पासून पुरावे गोळा केले होते. आजच्या निर्णयाने राजकीय वर्चस्व आणि लैंगिक हिंसाचाराचा काळा अध्याय न्यायालयाने उघड केला आहे.