अकोला न्यूज नेटवर्क
पनवेल – “आपली भाषा, आपली जमीन, आपली माणसं… हे सगळं विकून आपण मोठे व्हायचं का? महाराष्ट्र विकला गेला तर काही उरणार नाही. म्हणून मराठी जनतेने जागं झालं पाहिजे. महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका,” अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला साद घालत पनवेलमध्ये कळकळीचं आवाहन केलं.
शेतकरी कामगार पक्षाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी राज्य सरकार, उद्योगपती आणि मराठी जनतेच्या भूमिकेवर थेट सवाल उपस्थित केले. “आज रायगडात जमिनी नष्ट होतात, जमीन विकत घेणारे आपलेच, आणि डान्सबार सुरू करणारे बाहेरचे. शिवछत्रपतींच्या राजधानीची ही अवस्था का झाली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रातील जमिनी विकल्या जात आहेत, आणि विकणारेही आपलेच आहेत. बाहेरून येणारे उद्योगपती जमीन घेतात आणि स्थानिकांना कामही देत नाहीत. गुजरातमध्ये स्थानिक नसलेल्यांना शेतजमीन घेण्यास बंदी आहे, पण महाराष्ट्रात कुणीही येऊन जमीन खरेदी करू शकतो. हे चित्र बदललं नाही तर भविष्यात अमराठी आमदार, खासदार आणि नगरसेवक निवडून येतील,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
मराठी अस्मिता, रोजगार, भाषा आणि भूमिपुत्रांचे हक्क यावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. “सरकार आता आंदोलन करणाऱ्यांना ‘अर्बन नक्षल’ ठरवते. जमिनीच्या मुद्द्यावर आवाज उठवला, प्रकल्पास विरोध केला तर अटक केली जाते. मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहू देणार नाही,” असा कठोर इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिला.
नवी मुंबई विमानतळातील रोजगार, रायगडच्या डान्सबारची संख्या, गुजरातला जात असलेले प्रकल्प यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. “तुमच्याकडे पैसा यावा, कुटुंब उभं राहावं हे मी मान्य करतो, पण महाराष्ट्र विकून नाही. कान, डोळे उघडे ठेवा आणि सतर्क राहा,” अशा शब्दांत त्यांनी भाषणाचा शेवट केला.