अकोला न्यूज नेटवर्क
तिरुवनंतपुरम – दारू विक्रीतून होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम लक्षात घेऊन केरळ सरकारने एक अभिनव पाऊल उचलले आहे. या नव्या योजनेनुसार, ग्राहकाने दारूची बाटली परत केली तर त्यांना २० रुपये कॅशबॅक मिळणार आहे. केरळ उत्पादन शुल्क विभागाने यासंदर्भात दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून हे धोरण राज्यातील प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने राबवले जात आहे.
या योजनेअंतर्गत ८०० रुपयांहून अधिक किंमतीच्या प्रीमियम दारूच्या बाटल्या फक्त काचेच्या स्वरूपात विकल्या जातील. प्लास्टिक बाटल्यांची विक्री पूर्णपणे बंद केली जाईल. ग्राहकाकडून बाटली खरेदी करताना २० रुपये अधिक घेतले जातील. मात्र ही रक्कम रिकामी बाटली परत केल्यानंतर त्याच दुकानातून ग्राहकांना परत केली जाईल. यासाठी प्रत्येक बाटलीवर क्यूआर कोड लावण्यात येणार असून रिफंड प्रक्रिया ट्रॅक केली जाईल.
या योजनेचा पायलट प्रोजेक्ट सप्टेंबर २०२५ पासून तिरुवनंतपुरम आणि कन्नूर जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे. योजना यशस्वी ठरल्यास जानेवारी २०२६ पासून संपूर्ण राज्यात ती लागू केली जाणार आहे. यासाठी केरळ सरकारने ‘क्लीन केरळ कंपनी’सोबत भागीदारी केली आहे.
केरळमध्ये दरवर्षी जवळपास ७० कोटी रुपयांची दारू विकली जाते. यामध्ये ८० टक्के बाटल्या प्लास्टिकच्या असतात. या बाटल्या सार्वजनिक ठिकाणी, नद्यांमध्ये व रस्त्यांवर फेकल्या जातात, ज्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. त्यामुळे या धोरणामुळे प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी होईल, असे उत्पादन शुल्क मंत्री एम. बी. राजेश यांनी स्पष्ट केले.
तामिळनाडूत यशस्वीपणे राबवलेली अशीच योजना केरळने अभ्यासून आत्मसात केली आहे. सरकारच्या या पावलामुळे दारू विक्रीतून होणारा पर्यावरणीय भार काही प्रमाणात कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.