अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली – देशातील निवडणूक अधिकाऱ्यांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे. २०१५ पासून स्थिर असलेले बीएलओंचे (Booth Level Officer) मानधन आता दुपटीने वाढवण्यात आले असून ते ६ हजार रुपयांवरून थेट १२ हजार रुपये करण्यात आले आहे.
तसेच बीएलओ पर्यवेक्षकांचे मानधन १२ हजार रुपयांवरून वाढवून १८ हजार रुपये केले आहे. याशिवाय, निवडणूक यंत्रणेतील महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) आणि सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO) यांना पहिल्यांदाच मानधन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. ERO यांना ३० हजार रुपये आणि AERO यांना २५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
मतदार यादी पुनरीक्षणासाठी बीएलओंना मिळणारा भत्ता देखील १ हजार रुपयांवरून २ हजार रुपये करण्यात आला आहे.
“पारदर्शक आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करणे हे लोकशाहीसाठी अत्यावश्यक आहे. ही जबाबदारी पार पाडणाऱ्या बीएलओ, पर्यवेक्षक, ERO आणि AERO यांचे योगदान महत्त्वाचे असून त्याचा सन्मान म्हणून ही वाढ करण्यात आली आहे,” असे निवडणूक आयोगाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.