अकोला न्यूज नेटवर्क
अकोला – पोलिसांनी तडीपार केलेल्या कुख्यात गुन्हेगारांविषयी बातमी प्रकाशित केल्याचा राग मनात धरून अकोल्यातील एका हिंदी दैनिक चे संपादक आणि पत्रकारांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना शनिवारी उघडकीस आली. या हल्ल्यात संपादक हाजी सज्जाद हुसैन आणि त्यांचे पुत्र शहजेब हुसैन, तसेच पत्रकार साहिल हुसैन व शोएब मुशरफ हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्याच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला व बाळापूर तालुक्यातील दोन कुख्यात गुन्हेगारांना पोलिसांनी ६ महिन्यांसाठी तडीपार केल्याची अधिकृत प्रेसनोट काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. यानंतर स्थानिक वृत्तपत्रांतून संबंधित बातम्या प्रकाशित झाल्या. अकोल्यातील एका हिंदी दैनिकात देखील ही माहिती छापण्यात आली.
बातमी प्रकाशित झाल्यानंतर संबंधित आरोपी व त्यांच्या समर्थकांनी संपादक व पत्रकारांना धमक्यांचा मारा सुरू केला. यावर पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही शनिवारी सकाळी जनता भाजीबाजार परिसरात या हिंदी दैनिक कार्यालयाजवळ आरोपींनी संपादक व त्यांच्या सहकाऱ्यांवर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी आणि सिटी कोतवाली पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू आहे.
या हल्ल्यामुळे अकोल्यात पत्रकार संरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पत्रकार संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या हल्ल्याचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.