अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभ यात्रेकरूंच्या गर्दीमुळे झालेल्या भीषण चेंगराचेंगरीमधील १८ जणांच्या मृत्यूमागचं कारण आता अधिकृतरीत्या समोर आलं आहे. लोकसभेत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती देताना सांगितले की, अपघाताला कोणतं मोठं गोंधळाचं कारण नव्हतं, तर एका प्रवाशाच्या डोक्यावर सामान पडल्याने पुढील प्रवासी अडखळले आणि ही चेंगराचेंगरी झाली.
या दुर्घटनेत १८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये ४ मुले आणि ११ महिलांचा समावेश होता. १५ जण गंभीर जखमी झाले होते. समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना वैष्णव यांनी ही माहिती दिली. मंत्री म्हणाले, “प्लॅटफॉर्म १४-१५ जोडणाऱ्या पादचारी पुलावर रात्री ८:४८ वाजता गर्दी होती. यावेळी एका प्रवाशाच्या डोक्यावरून एक जड वस्तू खाली पडली. त्यामुळे काही प्रवासी पायऱ्यांवर अडखळले. त्यानंतर गोंधळ निर्माण होऊन चेंगराचेंगरी झाली. मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाला असल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे.”
रेल्वे मंत्री वैष्णव यांनी यावेळी हेही सांगितले की, “रात्री ८:१५ नंतर पुलावर प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली होती. अनेक प्रवासी डोक्यावर मोठं सामान घेऊन चालत होते. पुलाची रुंदी २५ फूट असूनही हालचालीस अडथळा येत होता.”
रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, त्या दिवशी एकाच नावाच्या दोन गाड्या असल्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. याशिवाय रेल्वे स्थानकावर त्या दिवशी सुमारे ४९ हजार जनरल तिकिटांची विक्री झाली होती. ही संख्या सरासरीपेक्षा १३ हजारांनी अधिक होती.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षेची व्यवस्था पुरेशी असली तरी अचानक आलेल्या अतिरिक्त प्रवासी लोंढ्यामुळे ही व्यवस्था पुरेशी ठरली नाही, असेही वैष्णव यांनी स्पष्ट केले.