अकोला न्यूज नेटवर्क
श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात दहशतवादविरोधी कारवायांचा जोर कायम ठेवत भारतीय सैन्यदलाने कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी रात्री आणखी एका दहशतवाद्याचा खात्मा केला. ऑपरेशन अखल नावाने राबवण्यात आलेल्या या कारवाईत भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलाच्या संयुक्त पथकाने भाग घेतला. ही कारवाई कुलगामच्या अखल गावात झाली असून परिसरात शोधमोहीम अद्याप सुरू आहे.
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाममधील अखल भागात चार ते पाच दहशतवादी लपले असल्याचा संशय होता. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी सुरक्षा दलांनी परिसराची घेराबंदी केली. रात्रीच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि त्याला प्रत्युत्तर देताना एक अज्ञात दहशतवादी ठार झाला, अशी माहिती चिनार कॉर्प्सने त्यांच्या एक्स हँडलवरून दिली.
“रात्रभर अधूनमधून गोळीबार सुरू राहिला. सैन्याने अचूक प्रत्युत्तर देत एक अतिरेकी ठार केला आहे,” असे चिनार कॉर्प्सने म्हटले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. अन्य दहशतवादी लपले असण्याची शक्यता लक्षात घेऊन परिसरात कसून शोध घेतला जात आहे.
गेल्या आठवड्याभरात काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात ही दुसरी मोठी कारवाई ठरली आहे. याआधी श्रीनगरजवळील लिडवास भागात झालेल्या ऑपरेशन महादेवमध्ये तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्याआधी ऑपरेशन शिवशक्ती अंतर्गत पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ दोन घुसखोर दहशतवादी ठार करण्यात आले होते.
२८ जुलै रोजी झालेल्या ऑपरेशन महादेवमध्ये ठार केलेल्या दहशतवाद्यांचा संबंध २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याशी होता. त्या हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिक रहिवाशाचा मृत्यू झाला होता. गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत ही माहिती दिली होती.
सुरक्षा दलांच्या सततच्या कारवायांमुळे दहशतवाद्यांचे मनोबल खचत चालले असून, जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा कटिबद्ध असल्याचे लष्कराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.