WhatsApp

राज्यसभेत भाजपाचं ऐतिहासिक शतक! ३ वर्षांनी पुन्हा गाठला १००चा टप्पा

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राज्यसभेत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा ऐतिहासिक शंभरचा टप्पा पार केला आहे. एप्रिल २०२२ नंतर पहिल्यांदाच भाजपाच्या खासदारांची संख्या १०२ वर पोहोचली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच केलेली चार सदस्यांची नामनिर्देशित नियुक्ती भाजपासाठी महत्त्वाची ठरली असून, त्यातील तीन सदस्य पक्षाशी संबंधित असल्यामुळे ही संख्यात्मक घोडदौड शक्य झाली आहे.



या नव्या सदस्यांमध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, आणि केरळमधील सामाजिक कार्यकर्ते सी सदानंदन मास्टर यांचा समावेश आहे. याशिवाय चौथ्या सदस्य म्हणून राजकीय इतिहासकार मिनाक्षी जैन यांचीही नियुक्ती झाली असून, त्या अपक्ष राहणार आहेत. या तीन नव्या भाजप समर्थक सदस्यांमुळे पक्षाची संख्या १०२ इतकी झाली असून, यामुळे राज्यसभेत भाजपाचं वर्चस्व अधिकच बळकट झालं आहे.

याआधी मार्च २०२२ मध्येही भाजपाने १०० चा टप्पा ओलांडला होता. त्या वेळी पक्षाच्या १०१ खासदारांची नोंद झाली होती. काँग्रेसला १९८८ व १९९० मध्ये असे यश मिळाले होते, तेव्हापासून हे दुसऱ्यांदा भाजपासाठी घडत आहे. सध्या राज्यसभेत एकूण २४० सदस्य आहेत, त्यातील ५ जागा रिक्त आहेत. १२ नामनिर्देशित जागांपैकी ५ जागा भाजपाच्या समर्थनार्थ आहेत. राज्यसभेत बहुमतासाठी १२१ खासदारांची गरज असते. भाजपा व सहयोगी पक्षांची एकत्रित संख्या ही आता १३४ पर्यंत गेली आहे, यामुळे येत्या उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजपासाठी बहुमत साधणे अधिक सोपे झाले आहे.

विशेष म्हणजे, उज्ज्वल निकम यांनी २६/११ च्या कसाब खटल्यात ऐतिहासिक कामगिरी बजावली होती. हर्षवर्धन श्रृंगला यांनी परराष्ट्र सचिव तसेच अमेरिकेतील राजदूत म्हणून देशाचं प्रतिनिधित्व केलं. सी सदानंदन मास्टर हे दक्षिण भारतात भाजपाचा सामाजिक आधार वाढवण्यासाठी ओळखले जातात. राज्यसभेतील ही संख्यात्मक स्थिती भाजपाच्या आगामी संसदीय रणनीतीला चालना देणारी ठरणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!