WhatsApp

अपंग नसतानाही घेतला लाभ! बनावट प्रमाणपत्र प्रकरणात पती-पत्नी पोलिसांच्या जाळ्यात

Share

अकोला न्यूज नेटवर्क
पुणे : राहुरी तालुक्यात बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींची नावे ताज निसार पठाण आणि रुबीना ताज पठाण अशी असून, त्यांच्यावर संजय गांधी निराधार योजना व इतर अपंग कल्याण योजनांचा लाभ घेऊन फसवणूक केल्याचा आरोप आहे. ही कारवाई ग्राम महसूल अधिकारी दीपक साळवे यांच्या फिर्यादीनंतर करण्यात आली.



देवळाली प्रवरा येथील नगरपरिषदेचीही फसवणूक करण्यात आली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. प्राथमिक चौकशीत या दोघांनी खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले. तपासादरम्यान प्रमाणपत्रे खोटी असल्याचे निदर्शनास आल्यावर महसूल अधिकाऱ्यांनी राहुरी पोलिसांकडे तक्रार दिली.

सरकारतर्फे बाजू मांडताना अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की, हे बनावट प्रमाणपत्र कुणाच्या संगनमताने बनवण्यात आले, याचा तपास आवश्यक आहे. यामध्ये सरकारी रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे तपासासाठी आरोपींना चार दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.

दरम्यान, याआधीही नगर जिल्ह्यात शिक्षकांनी बदलीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकार समोर आले होते. यासंदर्भात गुन्हे दाखल असून, जिल्हा परिषदेमार्फत शिक्षकांची पडताळणी सुरू आहे. जिल्हा रुग्णालयातून बनावट प्रमाणपत्रे तयार होत असल्याचेही समोर आले आहे. यावर कारवाईसाठी अंतर्गत चौकशी समितीद्वारे काही कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. मात्र, अशा प्रकारांवर आळा बसलेला नसल्याने दिव्यांग हक्कांसाठी लढणाऱ्या संघटना पुन्हा आंदोलक झाल्या आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!