अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : नुकतेच राज्याचे कृषीमंत्री झालेल्या दत्तात्रय भरणे यांनी पदभार घेतल्याच्या अवघ्या २४ तासांतच केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. इंदापूरमध्ये महसूल विभागाच्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांना उद्देशून बोलताना त्यांनी “सगळेच सरळ काम करतात, पण वाकडं करून परत सरळ करणाऱ्यांचीच नोंद घेतली जाते,” असे विधान केल्याने विरोधकांसह अनेकांनी याचा तीव्र निषेध केला आहे.
विधान परिषदेच्या अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रमी खेळल्याचे दृश्य व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीखाते काढून घेण्यात आले. त्यांच्या जागी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे यांची कृषीमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. पण पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भरणेंनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिलेला “अजब” सल्ला चर्चेचा विषय ठरतो आहे.
कार्यक्रमात बोलताना भरणे म्हणाले, “संकटं सगळ्यांवर येतात. पण अशा वेळी लोकांना सहकार्य केलं पाहिजे. सरळ काम सगळेच करतात, पण वाकडं करून नियमात बसवणाऱ्यांची माणसं लक्षात ठेवली जातात.” या वक्तव्यावरून प्रशासनात पारदर्शकतेऐवजी ‘जुगाड’ संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होत आहे.
विरोधकांनी भरणेंवर टीकास्त्र चालवताना राज्य सरकारचीच प्रतिमा मलीन करणारे हे विधान असल्याचं म्हटलं आहे. “राज्याचा कृषी खातं गंभीर आहे. ते चालवताना अशा जबाबदारीच्या पदावर असलेल्या मंत्र्यांनी नियमाला वाकवण्याचे संकेत देणे हे दुर्दैवी आहे,” अशी प्रतिक्रिया विरोधकांनी दिली आहे.
दत्तात्रय भरणेंच्या विधानामुळे त्यांच्या भविष्यातील प्रशासन शैलीबाबत साशंकता निर्माण झाली आहे. खास करून शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढत असताना, कृषीखात्याकडून प्रामाणिक सेवा अपेक्षित आहे. अशावेळी अशा वादग्रस्त विधानामुळे सरकारची विश्वासार्हताच डळमळीत होत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) गोटातही अस्वस्थता निर्माण झाल्याची माहिती आहे. मात्र, दत्ता भरणे किंवा त्यांच्या पक्षाकडून अद्याप या विधानावर खुलासा करण्यात आलेला नाही.