WhatsApp

अखेर प्रतीक्षा संपली! पीएम किसानचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून मोठी दिलासादायक घोषणा करत आज (२ ऑगस्ट) शनिवारी ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेचा २० वा हप्ता जारी करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथील एका सार्वजनिक कार्यक्रमातून एका क्लिकद्वारे देशभरातील ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटी (DBT) पद्धतीने २० हजार ५०० कोटी रुपये जमा केले.



पीएम किसान योजना ही २०१९ पासून सुरू करण्यात आलेली केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये एकूण ६ हजार रुपये शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ म्हणून दिले जातात. हे रकमेचे थेट लाभार्थ्यांच्या आधारशी संलग्न बँक खात्यात जमा केले जाते. आज जमा झालेला २० वा हप्ता हा याच मालिकेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

या कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून सुमारे २,२०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली. त्या कार्यक्रमातूनच त्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला. यावेळी त्यांनी नमूद केलं की, “हा निधी म्हणजे फक्त आर्थिक मदत नाही, तर देशाच्या अन्नदात्याला दिलेला विश्वासाचा हात आहे.”

पीएम-किसान योजनेद्वारे आजवर ३.६९ लाख कोटी रुपये देशभरातील शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. २० व्या हप्त्यात सुमारे ९.७ कोटी शेतकऱ्यांना २ हजार रुपयांचा हप्ता मिळाला आहे. याआधी फेब्रुवारी २०२५ मध्ये भागलपूर, बिहार येथून १९ वा हप्ता जारी करण्यात आला होता, ज्यामध्ये ९.८ कोटी शेतकऱ्यांना २२ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले होते.

दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या लहान व सीमांत शेतकऱ्यांसाठी ही योजना आर्थिक आधार ठरली आहे. बियाणं, खते, मशागत यासाठी लागणाऱ्या तातडीच्या खर्चाला हातभार लावणारी ही रक्कम शेतीशी जोडलेली असलेली गरज भागवते. बहुतांश लाभार्थी हे लघु शेतकरी असल्याने या योजनेचा परिणाम थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

मोदी सरकारने डिजिटल भारत संकल्पनेखाली ही योजना पारदर्शक पद्धतीने राबवली असून, शेतकऱ्यांना कोणत्याही दलालाशिवाय थेट मदतीचा लाभ मिळत आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. आगामी काळात योजनेत आणखी लाभार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी केंद्र प्रयत्नशील आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!