अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : देशातील रेल्वे स्थानकांवर स्वच्छता आणि आरोग्याच्या बाबतीत किती गंभीर दुर्लक्ष होत आहे, याचे चटपटीत उदाहरण एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. एका अनामिक रेल्वे स्थानकाच्या छतावर रेकॉर्ड करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये मोठ्या पाण्याच्या टाक्यांमध्ये माकडे आंघोळ करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, हेच पाणी प्रवासी पिण्यासाठी आणि चहा विक्रेते वापरत असल्याचे बोलले जात आहे.
व्हिडिओमध्ये माकडे एकमेकांवर पाणी उडवत मस्ती करताना, अगदी जल्लोषात स्नान करताना दिसत आहेत. प्रथमदर्शनी हा प्रकार मजेशीर वाटतो, पण यामागचा आरोग्याचा धोका गंभीर आहे. हा व्हिडिओ ‘आयुर्योगसंगम’ या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हजारो लोकांनी तो शेअर करत रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
तपासणीअंती कळते की ही टाकी स्थानकाच्या छतावर ठेवलेली असून ती पिण्याच्या पाण्यासाठी वापरली जात होती. व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने ही परिस्थिती कॅमेऱ्यात टिपली आणि सोशल मीडियावर टाकली. या क्लिपमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून अनेकांनी रेल्वेकडे स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
या प्रकारामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे स्थानकांवरील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता आणि देखभाल कोणत्या पद्धतीने केली जाते, याविषयी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेल्वे प्रशासनाने तातडीने या प्रकाराची दखल घेऊन उत्तर द्यावे, अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.