मुंबई : भारत सरकारच्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठी चित्रपटांनी आपली ठसा उमटवत अनेक मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये ‘श्यामची आई’ला सर्वोत्तम मराठी फीचर फिल्मचा, ‘नाळ २’ला सर्वोत्तम बालचित्रपटाचा आणि ‘आत्मपॅम्फ्लेट’ला सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या यशामुळे संपूर्ण मराठी चित्रसृष्टीत उत्साहाचे वातावरण आहे.
साने गुरुजींच्या कालजयी कादंबरीवर आधारित ‘श्यामची आई’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजय डहाके यांनी केलं असून हा चित्रपट कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट) तंत्रात चित्रित करण्यात आला आहे. यात ओम भुतकर, संदीप पाठक, ज्योती चांदेकर आणि सारंग साठ्ये यांच्या भूमिका असून आईच्या संस्कारांची आणि बालपणाच्या आठवणींची हृदयस्पर्शी मांडणी यात पाहायला मिळते.
दुसरा पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘नाळ २’ हा नागराज मंजुळे यांनी निर्मित केलेला असून लेखन-दिग्दर्शन सुधाकर रेड्डी यक्कंती यांनी केलं आहे. ‘नाळ’ या गाजलेल्या चित्रपटाचा हा पुढील भाग असून चैत्या आणि त्याच्या आयुष्यातील भावनिक प्रवास, बालपणीची निरागसता आणि कौटुंबिक नातेसंबंध यांचं सुरेख चित्रण यात करण्यात आलं आहे. श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, जितेंद्र जोशी, दीप्ती देवी आणि त्रिशा ठोसर या चित्रपटात झळकले आहेत.
तिसऱ्या पुरस्कारप्राप्त ‘आत्मपॅम्फ्लेट’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आशिष अविनाश बेंडे यांनी केलं असून हा चित्रपट त्यांचा पहिला दिग्दर्शकीय प्रयत्न आहे. परेश मोकाशी यांच्या पटकथेला आणि सत्यजित श्रीराम यांच्या छायाचित्रणाला साथ लाभली आहे. टी-सीरीज, कलर यलो आणि झी स्टुडिओज यांच्या निर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटात एका मुलाच्या दृष्टिकोनातून जातीय, सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर हलक्याफुलक्या पद्धतीने भाष्य केलं आहे. याला बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्येही नामांकन मिळालं होतं.
या पुरस्कारांमुळे मराठी चित्रपटसृष्टीचं नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळलं आहे.