WhatsApp

एसटी महामंडळ इंधन व्यवसायात; राज्यभर पेट्रोल-डिझेल पंप उभारण्याचा निर्णय

Share

अकोला न्यूज नेटवर्क
ठाणे – आर्थिक अडचणीमधून मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला असून, राज्यभरात व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल विक्री करणारे पंप सुरू करण्याची योजना हाती घेतली आहे. हा प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त उपक्रमातून राबवला जाणार असून, यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “महामंडळाची सध्याची आर्थिक स्थिती नाजूक असून, उत्पन्नाचे विविध स्रोत शोधणे गरजेचे आहे. इंधन विक्री हा त्यातील महत्त्वाचा टप्पा ठरेल.”

इंधन विक्रीचा अनुभव आधीपासूनच
गेल्या ७० वर्षांपासून एसटी महामंडळ डिझेल खरेदीसाठी इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांवर अवलंबून आहे. महामंडळाकडे सध्या २५१ डिझेल पंप असून, त्यातून केवळ एसटी बसेसना इंधन पुरवले जाते. त्यामुळे इंधन व्यवस्थापनाचा अनुभव आधीच असल्याने हे पाऊल सोपे जाणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
या योजनेसाठी इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांशी व्यावसायिक करार करण्यात येणार आहेत. महामंडळाच्या रस्त्यालगतच्या मोक्याच्या जागांवर – साधारण २५ बाय ३० मीटर क्षेत्रफळात – हे पंप उभारले जातील.

या पंपांवर इंधनासोबतच ‘रिटेल शॉप’ आणि सुविधा असलेली ‘पेट्रो-मोटेल हब’ तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे स्थानिक रोजगारात वाढ होईल, तर प्रवाशांनाही अनेक सुविधा उपलब्ध होतील.

पारदर्शक व्यवहार, नवा महसूल
केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्यामुळे महसूल वितरणात पारदर्शकता राखली जाईल. या प्रकल्पामुळे सर्वसामान्य ग्राहकांना विश्वासार्ह इंधन सेवा मिळेल आणि महामंडळाला उत्पन्नाचा स्थिर स्रोत उपलब्ध होईल.

Leave a Comment

error: Content is protected !!