अकोला न्यूज नेटवर्क
नाशिक – कृषी खाते कोणाकडे द्यावे, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत चर्चा आणि संघर्ष सुरू असतानाच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मलाही कृषिमंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा दावा भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून अलीकडेच कृषी खाते काढून घेण्यात आले असून त्यांना केवळ क्रीडा व युवक कल्याण खाते देण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर भुजबळांनी केलेले वक्तव्य विशेष लक्षवेधी ठरले आहे.
“अजित पवार आग्रह करत होते”
भुजबळ म्हणाले, “जेव्हा आम्ही पहिल्यांदा भाजप आणि शिंदे गटासोबत सरकारमध्ये आलो, त्यावेळी अजितदादा यांनी अर्थ खाते घेतले आणि इतर विभागांचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला. ‘कृषी खाते घ्या, ते चांगले आहे,’ असा त्यांचा आग्रह होता.” मात्र, मी स्वतःहून कृषी खाते नाकारल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले.
“कृषी खात्याला ग्रामीण लोकच न्याय देऊ शकतात”
कृषी क्षेत्रातील प्रश्नांची बारकाईने माहिती ग्रामीण भागातील लोकांना अधिक चांगली असते, त्यामुळे हे खाते अशा व्यक्तीकडे जाणे योग्य असल्याचे मी त्यांना सांगितले, असे भुजबळ म्हणाले. “मी मुंबईतून राजकारण केलं आहे, त्यामुळे कृषी खात्याला न्याय देण्यासाठी ग्रामीण पार्श्वभूमी आवश्यक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
“भरणे मामा यांना खातं मिळालं, ते योग्य निर्णय”
दत्तात्रय भरणे यांना कृषी खाते देण्यात आले असून त्यांनी या खात्याला योग्य न्याय दिला जाईल, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. “बालपणापासून ग्रामीण जीवन जगलेले लोक अधिक चांगलं काम करू शकतात. प्रत्येक खाते महत्त्वाचे असते, प्रश्न नेतृत्वाच्या शैलीचा असतो,” असे म्हणत त्यांनी माणिकराव कोकाटे यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला.
कृषी खात्याविषयीची ही अंतर्गत रस्सीखेच उघड झाल्याने पक्षांतर्गत समन्वय, निर्णयप्रक्रिया आणि नेतृत्वशैलीवर नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.