WhatsApp

स्टारलिंकला भारतात सेवा परवाना; प्रत्येक गावात आता थेट हाय-स्पीड इंटरनेट

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली – एलन मस्क यांच्या स्टारलिंक (Starlink) कंपनीला अखेर भारतात सॅटेलाइट-आधारित इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून एकात्मिक परवाना मिळाला आहे. ही घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केली असून, भारतातील इंटरनेट क्रांतीसाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. या निर्णयामुळे देशातील दूरदूरच्या खेड्यांमध्येही थेट इंटरनेट पोहोचणार आहे.



डिजिटल क्रांतीसाठी निर्णायक पाऊल
दूरसंचार क्षेत्रात देशातील पहिल्या मोबाइल कॉलला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात सिंधिया यांनी सांगितले, “स्टारलिंकला उपग्रह इंटरनेटसाठी एकात्मिक परवाना देण्यात आला आहे. स्पेक्ट्रम वाटप, गेटवे उभारणीसाठी धोरणात्मक चौकटही तयार करण्यात आली आहे.”

गेटवे म्हणजे उपग्रह डेटा थेट भारतीय नेटवर्कमध्ये आणणारी महत्त्वाची यंत्रणा. यामुळे भारतात उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा अधिक गतिमान आणि विश्वासार्ह होणार आहे.

OneWeb आणि Jio SES समोरही स्पर्धा
भारताच्या टेलिकॉम क्षेत्रात आधीच यूटेलसॅट वनवेब आणि जिओ एसईएस या कंपन्या उपग्रह सेवेसाठी तयारी करत आहेत. स्टारलिंकच्या प्रवेशामुळे या क्षेत्रात नव्या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. स्पेक्ट्रम वाटपाबाबतही सरकारची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

शिक्षण, आरोग्य, व्यवसाय क्षेत्रात नवा अध्याय
सिंधिया म्हणाले, “डोंगराळ व दूरच्या भागात जिथे फायबर पोहोचवणे अशक्य आहे, तिथे स्टारलिंकमुळे शिक्षण, आरोग्य, आणि लघुउद्योजकतेसाठी नवे दरवाजे उघडणार आहेत.” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत देशाने डिजिटल परिवर्तनात घेतलेली झेपही अधोरेखित केली.

स्टारलिंकची कार्यपद्धती वेगळी का?
पारंपरिक सॅटेलाइट इंटरनेटप्रमाणे उच्च लेटन्सीचा त्रास न देता, स्टारलिंक पृथ्वीच्या खालच्या कक्षेत असलेल्या (LEO) हजारो लघु उपग्रहांच्या नेटवर्कद्वारे सेवा पुरवते. हे उपग्रह एकमेकांशी थेट संपर्क साधतात, त्यामुळे इंटरनेट सिग्नल लवकर आणि प्रभावी पोहोचतो. यामुळे व्हिडिओ कॉलिंग, गेमिंग, आणि स्ट्रीमिंग या सेवा शहरांइतक्याच गतीने आता गावातही मिळणार आहेत.

अलीकडेच कंपनीने फाल्कन-९ रॉकेटद्वारे २८ नवीन उपग्रह प्रक्षेपित केले असून, सध्या जवळपास ८,००० पेक्षा जास्त स्टारलिंक उपग्रह कार्यरत आहेत.

भारतातील इंटरनेट आकडेवारी
सध्या देशात १.२ अब्ज टेलिफोन कनेक्शन आहेत. इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ९७ कोटींवर पोहोचली असून गेल्या काही वर्षांत त्यात २८६ टक्के वाढ झाली आहे. आता स्टारलिंकसारख्या नव्या प्लेयर्समुळे इंटरनेटचे प्रसार आणि गुणवत्ता दोन्ही वाढण्याची अपेक्षा आहे.

‘डिजिटल इंडिया’ अधिक वेगात
स्टारलिंकच्या माध्यमातून भारत सरकारचे ‘डिजिटल इंडिया’ अभियान आता नवीन उंची गाठण्याच्या दिशेने वाटचाल करेल. हा परवाना केवळ एक तांत्रिक करार नसून, तो ग्रामीण भारताला ग्लोबल नेटवर्कशी जोडणारा एक महत्वाचा सेतू ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!