WhatsApp

काँग्रेसमध्ये बदलांचा धडाका; राज्य युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिवराज मोरे

Share

अकोला न्यूज नेटवर्क
पुणे – काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत संघटनात्मक बदलांना वेग आला असून, आता युवक काँग्रेसच्या राज्य अध्यक्षपदावरही नवीन चेहरा समोर आला आहे. विद्यार्थी चळवळीतील अनुभवी कार्यकर्ता शिवराज मोरे यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासह राज्य कार्यकारिणीत आणखी काही नव्या नियुक्त्या लवकरच जाहीर होणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.



मोरे यांच्या या नियुक्तीला काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयभानू चिब यांच्यासह प्रभारी श्रीकृष्ण अलावरु आणि राष्ट्रीय सरचिटणीस अजय चीकरा यांची मान्यता लाभली आहे. त्यांना अधिकृत नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

विद्यार्थी चळवळीतून काँग्रेसमध्ये सक्रिय प्रवेश
शिवराज मोरे यांची राजकीय कारकीर्द २०१० साली एनएसयूआयच्या महाराष्ट्र अध्यक्षपदापासून सुरू झाली. त्यांनी २०१० ते २०१४ दरम्यान दोनदा या पदाची जबाबदारी सांभाळली. नंतर एनएसयूआयचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून देशभरात त्यांनी काम केले. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत त्यांना युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी व नंतर कार्याध्यक्षपदी नेमण्यात आले. आता ते अध्यक्षपदावर पोहोचले आहेत.

साताऱ्यातील कराड येथील सर्वसामान्य कुटुंबातून आलेले मोरे यांनी शिक्षण, बेरोजगारी, सामाजिक न्याय यांसारख्या विषयांवर अनेक आंदोलने केली आहेत. त्यांचा झोकून देणारा कार्यकर्ता म्हणून ओळख आहे.

Watch Ad

राज्य युवक काँग्रेसमध्ये लवकरच मोठे बदल
सध्या फक्त अध्यक्षपदाची घोषणा झाली असून, संपूर्ण कार्यकारिणी लवकरच जाहीर होईल. नव्या नेतृत्वाकडून पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करण्याची अपेक्षा आहे. युवक काँग्रेसकडून सांगण्यात आले की, “मोरे यांच्या नेतृत्वात राज्यातील तरुणांचे प्रश्न अधिक आक्रमकपणे मांडले जातील.”

राज्याच्या राजकारणात युवा नेतृत्व पुढे येत असल्याचे या नियुक्तीमधून स्पष्ट होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!