अकोला न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगरजवळील वाळुंज शिवारातील तिसगाव येथे बनावट नोटा तयार करणारा कारखाना आणि त्याच्या सहाय्याने राज्यात बनावट नोटा पसरवणारे रॅकेट नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या कारवाईत ७ आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार अंबादास ससाने अद्याप फरार आहे. कारखान्यातून ५९ लाख ५० हजार रुपयांच्या छापलेल्या बनावट नोटांसह २ कोटी १६ लाख रुपयांच्या नोटा तयार करता येतील असा साहित्य व यंत्रसामग्री पोलिसांनी जप्त केली आहे.
ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी शुक्रवारी दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते उपस्थित होते.
अटक करण्यात आलेले आरोपी:
निखिल गांगर्डे (कोंभळी), सोमनाथ शिंदे (अहिल्यानगर), प्रदीप कापरे (शिरूर कासार), मंगेश शिरसाठ, विनोद अरबट, आकाश बनसोडे, अनिल पवार (सर्व छत्रपती संभाजीनगर) यांना अटक झाली आहे. अंबादास ससाने (शेवगाव) फरार आहे.
गुन्ह्याचा उलगडा कसा झाला?
अहिल्यानगरच्या अंबिलवाडी परिसरात दोन आरोपी बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सहायक निरीक्षक गीते यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि दोघांना अटक केली. तपास पुढे वाढवत प्रदीप कापरे, विनोद अरबट, आणि नंतर कारखाना चालवणाऱ्या इतर आरोपींना पकडण्यात आले. मात्र मुख्य सूत्रधार ससाने पसार झाला.
कारागृहातून तयार झाली गुन्हेगारी टोळी
ससाने याला पूर्वीही बनावट नोटा प्रकरणात अटक झाली होती. हरसुल कारागृहात त्याची ओळख शिरसाठ व बनसोडे यांच्याशी झाली आणि तेथून या टोळीचा उगम झाला.
नगर जिल्ह्यातील कनेक्शन आणि पूर्वीचा गुन्हा
या कारखान्याच्या आधी, राहुरी पोलिसांनी टेंभुर्णी येथील बनावट नोटा कारखाना उघडकीस आणला होता. दोन्ही प्रकरणांत कर्जत तालुक्यातील आरोपी आढळल्याने, पोलिस आता या गुन्ह्यांमध्ये संबंध आहे का, हे तपासत आहेत.
सावधगिरीचा इशारा बँकांना
बनावट नोटांचा धोका लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्व बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात येणार असून, संशयास्पद नोटा स्वीकारताना अधिक दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.