WhatsApp

समरसता साहित्य संमेलनावर बहिष्काराचा सूर; संविधानवाद्यांचे जाहीर आवाहन

Share

अकोला न्यूज नेटवर्क
नांदेड – २०व्या समरसता साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला नांदेडमध्ये वादळाचे वातावरण तयार झाले आहे. संविधानवादी, प्रगतिशील लेखक व सामाजिक समतेवर विश्वास ठेवणाऱ्या संघटनांनी संमेलनावर बहिष्कार टाकण्याचे जाहीर आवाहन केले असून, संमेलनाची संकल्पना ‘भ्रामक’ असल्याचा आरोप केला आहे.



साहित्यिक नरहर कुरुंदकर यांची कर्मभूमी असलेल्या नांदेडमध्ये श्री गुरुगोविंदसिंघजी साहित्य नगरीत ३ ऑगस्टपासून संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात असताना, समांतरपणे विरोधाचे सूर तीव्र झाले आहेत. साहित्य परिषदेतर्फे १९९८ पासून सुरू असलेल्या या संमेलनाचे यंदा अध्यक्ष पद्मश्री नामदेव कांबळे आणि उद्घाटक भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो असणार आहेत. खासदार अजित गोपछडे स्वागताध्यक्ष, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मार्गदर्शक म्हणून घोषित आहेत.

मात्र संमेलनाला विरोध करणाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात “समरसता ही सामाजिक वास्तवावर फसवणूक करणारी कल्पना आहे. ही संकल्पना संविधानाच्या आणि समतेच्या तत्वांच्या विरोधात आहे,” असे म्हटले आहे. पत्रकावर डॉ. संतोष हंकारे, डॉ. गजानन देवकर, डॉ. प्रकाश मोगले, प्रा. दिलीप चव्हाण, कॉ. उज्ज्वला पडलवार यांच्यासह अनेक प्रगतीशील विचारवंतांची नावे आहेत.

संमेलनविरोधी पत्रक जाहीर झाल्यानंतरही शुक्रवारी संध्याकाळपर्यंत आयोजकांनी यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नव्हती. तसेच संमेलनाध्यक्षांचे भाषण मुद्रित स्वरूपात मागवले असतानाही आयोजकांनी उद्घाटनाच्या वेळीच ते देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

या वादामुळे संमेलनाच्या स्वरूपावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नांदेडसारख्या वैचारिकदृष्ट्या सजग शहरात मतभेदाची ठिणगी पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!