अकोला न्यूज नेटवर्क
पुणे – पुणे जिल्ह्यातील यवत (ता. दौंड) परिसरात शुक्रवारी सकाळी एका वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टनंतर तणाव निर्माण झाला. यामध्ये काही वाहनांची जाळपोळ आणि मस्जिदची तोडफोड झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः घटनास्थळी गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आणि जनतेला संयम ठेवण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “चुकीचं स्टेटस एका बाहेरच्या व्यक्तीने ठेवलं. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करत जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. परिस्थिती सध्या पूर्ण नियंत्रणात आहे. अशा घटनांमागे जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. दोषींवर निश्चित कारवाई होईल. अफवांवर विश्वास ठेवू नका.”
ते पुढे म्हणाले, “सभेनंतर स्टेटस ठेवलं, याचा अर्थ सभेमुळेच दंगल झाली असं ठरवू नका. काही लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकरणांचा सखोल तपास केला जाईल.”
दरम्यान, दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यवतला भेट दिली. त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली व नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “इथे आजपर्यंत अशी घटना झाली नव्हती. मध्य प्रदेशमधील घटनेच्या संदर्भात एकाने स्टेटस ठेवले आणि तणाव वाढला. पण पोलिसांनी योग्यवेळी हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली आहे.”
ते पुढे म्हणाले, “ज्याने स्टेटस टाकलं, त्याचा यवतशी थेट संबंध नाही. तो बाहेरून आलेला आहे. आम्ही यवतकरांना आवाहन करतो की, संयम ठेवा, अफवांवर विश्वास ठेवू नका. बाजारपेठा बंद झाल्या होत्या, पण आता सामान्य स्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
फडणवीस व अजित पवार दोघांनीही घटनेला राजकीय रंग न देण्याचे आवाहन करत यवतकरांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले.