WhatsApp

“२५ खून, बॉयलरमध्ये मृतदेह टाकला, नदीत तुकडे फेकले”; वाल्मिक कराडचं भीषण गुन्हेगारी जग उघडं

Share

अकोला न्यूज नेटवर्क
परळी / बीड : संतोष देशमुख खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड वाल्मिक कराडविरोधात अजून गंभीर आरोप समोर आले आहेत. बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी दावा केला आहे की, “वाल्मिक कराडने आतापर्यंत किमान २५ खून केले आहेत. एका केवळ १४ वर्षांच्या मुलाचाही त्याने निर्दयपणे खून केला.” या दाव्याने संपूर्ण मराठवाडा हादरला आहे.



खूनी विकृतीचे कथित तपशील
कासले पुढे म्हणाले की, “वाल्मिक कराड इतका विकृत आहे की काही मृतदेह त्याने थेट बॉयलरमध्ये टाकले, तर काहींचे तुकडे करून नदीत फेकले. माझ्याकडे त्याचे ठोस पुरावे आहेत.”
त्यांनी पुढे दावा केला की, “आजही त्याचा मुलगा श्री कराड मला फोन करून धमकावत आहे. १४ वर्षांच्या मुलाच्या हत्येचे पुरावे मी लवकरच सादर करणार आहे.”

राजकीय हालचाली आणि एसआयटीची मागणी
या पार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणातील सर्व खून एकत्रितपणे तपासण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. “परळीतली दहशत संपत आली असली तरी मागील खुनांचा ससेमीरा अनेकांच्या मागे लागणार,” असेही धस यांनी सांगितले.

महादेव मुंडे खून प्रकरणातील एसआयटी कार्यरत
दरम्यान, महादेव मुंडे खून प्रकरणासाठी आधीच एक एसआयटी कार्यरत आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मागणीनुसार ही समिती तयार करण्यात आली आहे. याचे नेतृत्व अमरावतीचे अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत करत असून, त्यांच्यासोबत निरीक्षक संतोष साबळे आणि सहाय्यक निरीक्षक सपकाळ यांचा समावेश आहे.

गुन्हेगारी जगतातील थरारक दुवा उघडणार?
कासले यांच्या आरोपांनंतर आता या खटल्यातील तपास अधिक गंभीर व व्यापक स्वरूप धारण करू शकतो. जर त्यांचे पुरावे ठोस ठरले, तर परळीतील गुन्हेगारी कारवायांची नवी आणि भीषण गुंतागुंत समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!