अकोला न्यूज नेटवर्क
सोलापूर – शहरातील एका नामांकित खाजगी शाळेतील 56 वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेच्या पार्किंगमध्ये हे विकृत कृत्य केल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे. 19 एप्रिल ते 3 जुलै या कालावधीत शिक्षकाकडून वारंवार अश्लील वागणूक दिली गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
पीडित मुलीनं दिलेल्या फिर्यादीत नमूद केलं आहे की, “तुला काही ज्ञान नाही”, “तू काही कामाची नाहीस”, “आता तू चांगली सापडली आहेस” अशा अपमानास्पद आणि मानसिक त्रास देणाऱ्या धमक्यांनी ती घाबरली होती. त्यामुळे इतक्या दिवसांनी ही घटना उघड झाली आहे.
मुख्याध्यापकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विद्यार्थिनीला धीर देत योग्य सल्ला दिला आणि सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. त्यानुसार आरोपी शिक्षकाविरुद्ध विनयभंग, धमकी आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या आधीही घडलं होतं असंच प्रकरण
सोलापुरात काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना उघडकीस आली होती. तेव्हाही एका खाजगी शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करत, तिला ‘प्रपोज’ केलं. नकार देऊनही मुलीचा हात पकडून जबरदस्तीने शाळेच्या आवारात तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. ‘माझ्याशी राहिली नाहीस, तर काहीतरी वाईट करून घेईन’ अशी धमकी देऊन तिला मानसिक त्रास दिला होता. त्या प्रकरणातही POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

शाळा परिसरात सुरक्षेचा प्रश्न
अशा घटना शिक्षण संस्थांतील सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उभं करतात. शाळेतील विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या शिक्षकांकडूनच अशा विकृत प्रकार घडल्यास पालकांचा शाळांवरचा विश्वास डळमळीत होतो. शिक्षण क्षेत्रातील शिस्त, नैतिकता आणि विश्वासाला तडा जाणाऱ्या या घटनांनी पालकांमध्ये अस्वस्थता आणि संताप निर्माण झाला आहे.
पोलीस आणि प्रशासन सजग होणार का?
या घटना केवळ गुन्हेगारीच्या चौकटीत न ठेवता, त्या सामाजिकदृष्ट्याही गंभीर आहेत. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई केली असली तरी शाळा व्यवस्थापन, शिक्षण विभाग आणि पालकांनी याबाबत एकत्र येऊन ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.