अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई – मालेगाव साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात आलेल्या निकालावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेवर (NIA) सडकून टीका केली आहे. “गोडसेने गोळी झाडताना धर्म बदलला होता का? तो गुन्हेगार होता, मारेकरी होता. दहशतवादाचा धर्म नसतो. परंतु आरोपींना शिक्षा होत नसल्याचं चित्र दिसतं. हे यंत्रणांच्या अपयशाचं लक्षण आहे,” असा थेट सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
“एनआयए अपयशी, कारण ती अमित शाहांच्या अधिपत्याखाली”
चव्हाण म्हणाले की, मालेगावसह पहलगाम हल्ला, ट्रेन ब्लास्ट यासारख्या घटनांमध्ये आरोपी सापडले नाहीत, पुरावे मिळाले नाहीत म्हणून दोषी मोकळे झाले. आता मालेगाव खटल्यातील निकाल देखील सरकारच्या तपास संस्थेच्या गंभीर अपयशाचे द्योतक आहे. “एनआयए ही संस्था गृहमंत्री अमित शाह यांच्या अधिपत्याखाली काम करते. तोपर्यंत असे निकाल अपेक्षितच आहेत,” असा टोलाही त्यांनी लगावला.
“न्यायालयीन निकाल आधीच ठरलेला होता?”
मालेगाव खटल्यावर प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले की, “स्फोट आपोआप झाला नाही. तो कोणीतरी घडवून आणला होता. पण पुरावेच न दिल्यामुळे आरोपी निर्दोष सुटले. जर त्यांनी स्फोट घडवला नसेल, तर कोणी केला हे सरकार सांगत नाही. मग मृत्युमुखी पडलेल्यांना काय सांगणार?”
“भगवा आमच्यासाठी राष्ट्रभक्तीचा रंग”
चव्हाण यांनी भाजपवर भगव्या रंगाच्या संदर्भात देखील निशाणा साधला. “भगवा हा ज्ञानेश्वरांचा, राष्ट्रभक्तीचा रंग आहे. त्याला दहशतवादाशी जोडू नका. दहशतवाद्याचा जात-धर्म नसतो. तो केवळ गुन्हेगार असतो,” असे ते म्हणाले.
“मुख्यमंत्री माफीचं बोलतात, पण पुरावे कुठे?”
सरकारकडून सतत काँग्रेसच्या माफीची चर्चा केली जाते. यावर उत्तर देताना चव्हाण म्हणाले, “जेव्हा एनआयएच पुरावे सादर करू शकत नाही, आरोपी सुटत असतील, तेव्हा माफीचा प्रश्नच येत नाही. हे सरकार आणि त्यांच्या यंत्रणांचे अपयश आहे.”
“मृत्युमुखी पडलेल्यांना कोण जबाबदार?”
“जे मुंबईत, मालेगावात मृत्युमुखी पडले, जखमी झाले, त्यांच्या न्यायासाठी हे सरकार गंभीर नाही. निकाल काय लागणार, याची कल्पना आधीच होती,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.