अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई – अनुकंपा तत्वावरील शिक्षण सेवकांना यापुढे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य असणार आहे. सप्टेंबर २०२४ नंतर नियुक्त होणाऱ्या शिक्षण सेवकांनी पुढील पाच वर्षांच्या आत पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. ही परीक्षा १ सप्टेंबर २०२९ पर्यंत उत्तीर्ण न केल्यास त्यांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात येणार आहे. मात्र, अशा व्यक्तींना अनुकंपा धोरणानुसार इतर पदावर नियुक्ती मिळू शकते.
मागील सूट आता रद्द
यापूर्वी अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या प्राथमिक शाळांतील शिक्षण सेवकांना TET पास होण्यापासून सूट देण्यात आली होती. ही सवलत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (NCTE) मानकांशी विसंगत असल्याने ती आता रद्द करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या नव्या आदेशानुसार, अनुकंपा तत्वावर शिक्षक म्हणून नियुक्त झालेल्यांनी TET परीक्षा देणे आणि पास होणे बंधनकारक केले आहे.
पाच वर्षांचा कालावधी दिला
ताज्या निर्णयानुसार, २ सप्टेंबर २०२४ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या शिक्षण सेवकांना तीन वर्षांच्या ऐवजी पाच वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. १ सप्टेंबर २०२९ पर्यंत TET पास झाल्यास त्यांना सेवा सातत्य व अनुषंगिक लाभ पूर्वलक्षी प्रभावाने दिले जातील. मात्र, TET उत्तीर्ण न झाल्यास त्यांची शिक्षक पदावरील नियुक्ती समाप्त करून, अनुकंपा धोरणानुसार इतर पदांवर समायोजन करण्यात येणार आहे.
सेवेसातत्याची अट लागू नाही
टीईटी परीक्षा पास होईपर्यंत अशा शिक्षकांना सेवासातत्याचा लाभ मिळणार नाही. यामुळे, ही परीक्षा उत्तीर्ण करणे ही केवळ पात्रतेची नव्हे, तर सेवासातत्यासाठीही महत्त्वाची अट ठरणार आहे.

शिक्षक संघटनांमध्ये अस्वस्थता
या निर्णयामुळे अनेक शिक्षक संघटनांमध्ये अस्वस्थता असून, काही संघटनांनी या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, अनुकंपा तत्वावर आलेले उमेदवार अचानक परीक्षा दिली नाही म्हणून सेवेतून वगळणे हे अन्यायकारक ठरेल.