अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई – वैवाहिक वादात पत्नीने पतीविरोधात “नपुंसक” असल्याचा आरोप केला, तर तो गुन्हा मानता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका खटल्यात दिला आहे. न्यायमूर्ती एस.एम. मोडक यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की, अशा प्रकारचा आरोप भारतीय दंड संहिता (IPC) कलम ४९९ अंतर्गत अपवादामध्ये मोडतो.
विवाहातील वादांमध्ये आरोप प्रासंगिक
हिंदू विवाह अधिनियमानुसार, पती-पत्नीमध्ये वैवाहिक वाद चालू असताना पत्नी मानसिक छळ सिद्ध करण्यासाठी पतीच्या लैंगिक क्षमतेबाबत आरोप करू शकते. हायकोर्टाने स्पष्ट केलं की, हे आरोप खाजगी न्यायिक प्रक्रियेत मांडले गेले असून त्यामागे धमकीचा उद्देश नाही. त्यामुळे याला मानहानी मानता येणार नाही.
तक्रारीचा घटनाक्रम
या प्रकरणात पतीने पत्नी, तिचे वडील आणि भाऊ यांच्यावर मानहानीची तक्रार केली होती. पतीचा आरोप होता की, पत्नीने घटस्फोट, देखभाल आणि एफआयआरमध्ये अपमानजनक आरोप करून त्याला “नपुंसक” म्हटलं. मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेटने एप्रिल २०२३ मध्ये तक्रार फेटाळली होती, मात्र एप्रिल २०२४ मध्ये सत्र न्यायालयाने मॅजिस्ट्रेटचा आदेश रद्द करत पुढील तपासाचे आदेश दिले. त्याविरोधात पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात धाव घेतली.
कोर्टाचे निरीक्षण
कोर्टाने नमूद केलं की, वैवाहिक नात्यातील मानसिक छळाच्या अनुषंगाने अशा आरोपांना न्यायालयीन संरक्षण आहे. पत्नीला तिची बाजू सादर करण्याचा हक्क आहे आणि त्या उद्देशाने केलेले आरोप ‘मानहानी’ म्हणून ग्राह्य धरले जाऊ शकत नाहीत. पतीच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचा दावा केला असला तरी तो याच खटल्याच्या मूलगामी मुद्यावर परिणाम करत नाही.
न्यायालयाचा ठोस निष्कर्ष
हायकोर्टाने स्पष्ट केलं की, वैवाहिक वादात जेव्हा पत्नी न्यायालयात तिच्या मानसिक छळाचे पुरावे सादर करते, तेव्हा त्या अंतर्गत “नपुंसकतेसारखे आरोप” करणे कायदेशीरदृष्ट्या बिनचूक आहे. त्यामुळे पतीने दाखल केलेली मानहानी याचिका फेटाळण्यात आली.