अकोला न्यूज नेटवर्क
सहारनपूर (उत्तर प्रदेश) – पतीच्या निधनानंतर आईने घरातील रोकड, दागिने, मालमत्ता विकून आपल्या बॉयफ्रेंडसोबत फरार झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा मनीष वर्मा याने पोलिसांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे. “आई आणि तिच्या मैत्रिणी मला धमक्या देतात. ते मला मारून टाकतील”, अशी थरथर कापणारी माहिती मनीषने पोलिसांना दिली आहे.
आई फरार, घरात उपासमार
मनीषच्या वडिलांचे काही काळापूर्वी आजाराने निधन झाले. त्यानंतर त्याच्या आईचे मुझफ्फरनगरच्या अनुज भाटी नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध सुरू होते. २५ जुलैपासून ती रिहाना, नूरजहाँ आणि शहजादी नावाच्या महिलांसोबत पंजाबला गेली आणि तेथून अनुजसोबत पळून गेल्याचे मनीषने सांगितले. त्या घरातून साडेतीन लाखांची रोख रक्कम, मौल्यवान दागिने घेऊन गेल्याचाही आरोप आहे.
“माझा जीव धोक्यात आहे” – मनीष
मनीषचा दावा आहे की, आईच्या मैत्रिणी शेतकरी संघटनेशी संबंधित असल्याने त्यांच्याविरोधात कोणीही काही करू शकत नाही. या महिलांनी त्याला धमकावलं आणि मारहाण केली. “जर मी पोलिसात तक्रार केली तर खोट्या प्रकरणात अडकवून मला संपवतील,” अशी धमकीही दिल्याचा आरोप आहे. घरात अन्नपाण्याचीही वानवा असून, तो आणि त्याचा भाऊ अत्यंत भयग्रस्त अवस्थेत राहत आहेत.
पोलिस तपासाच्या प्रतीक्षेत न्याय
मनीषने गंगोह कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आईच्या आणि अनुजच्या शोधासाठी पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. मात्र, मुलाने पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली असून, “आम्ही न्यायासाठी झगडतो आहोत,” असं त्याचं म्हणणं आहे.
ही घटना केवळ कौटुंबिक नाही, तर अल्पवयीन मुलाच्या सुरक्षिततेवर आणि मानसिक अवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. पोलिसांकडून लवकर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.