WhatsApp

आता रम्मी ‘राज्य खेळ’? कोकाटेंच्या खातेबदलावर विरोधकांचा थेट शाब्दिक हल्ला

Share

अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : ऑनलाइन रम्मी खेळल्याच्या वादात अडकलेल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना अखेर खातेबदलाचा फटका बसला असून त्यांच्याकडील कृषीखातं काढून त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण खाते देण्यात आलं आहे. यानंतर राज्यातील राजकारणात टीकेचे सूर पुन्हा एकदा गडद झाले आहेत. विरोधकांनी कोकाटेंवर आणि सरकारवर बोचरी टीका करताना हा निर्णय म्हणजे ‘पदासाठीचा पुरस्कार’ असल्याचा आरोप केला आहे.



दानवेंची कविता आणि ताशेरे
शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी थेट कविता करत कोकाटेंना टोला लगावला. “पदके नाही, ‘रम्मी’कडूनच बक्षिसांची अपेक्षा”, असे म्हणत त्यांनी कोकाटेंवर उपरोधिक टीका केली. त्यांच्या कवितेने सामाजिक माध्यमांवर जोरदार चर्चा पेटली आहे.

राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची खोचक टिप्पणी
“महाराष्ट्रातील शेतकरी व तरुणांना न्याय मिळो न मिळो, मंत्र्यांच्या ‘कलागुणांना’ नक्कीच चालना मिळते,” अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार गटाने सरकारवर हल्ला चढवला. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनीही कोकाटेंच्या मंत्रीपदावर नाराजी व्यक्त केली.

सुळे म्हणाल्या – ‘राजीनामा घ्या’
सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, “राज्यातील तरुण पिढी ऑनलाइन रम्मीच्या आहारी जात असताना, सभागृहात रम्मी खेळणाऱ्या मंत्र्याला क्रीडा खाते देणे म्हणजे सरकारचा क्रूर विनोद आहे.” त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही केली.

रोहित पवारांनी साधला निशाणा
“खातेबदल म्हणजे सरकार सुटलं असं समजू नका,” असे म्हणत रोहित पवार यांनी थेट सत्ताधाऱ्यांच्या जबाबदारीवर बोट ठेवले. “शेतकऱ्यांना फटका बसत होता, म्हणून राजीनाम्याची मागणी होती,” असंही ते म्हणाले.

राजू पाटील यांची खोचक प्रतिक्रिया
मनसेचे नेते राजू पाटील यांनी ‘रम्मीला राज्य खेळाचा दर्जा दिला की काय?’ असा उपरोधिक प्रश्न विचारत, सध्याच्या सरकारच्या निर्णय प्रक्रियेवर टीका केली.

सरकारवर विश्वास कमी
या वादानंतर सरकारच्या कार्यक्षमतेबद्दल आणि प्राधान्यक्रमांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, कोकाटेंच्या खातेबदलाने वाद काही थांबलेले नाहीत. उलट विरोधकांनी या निर्णयाला राजकीय टिंगलटवाळीचे कारण बनवले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!