अकोला न्यूज नेटवर्क
पुणे : सणासुदीच्या काळात ग्राहकांना महागाईचा कडवा अनुभव येण्याची चिन्हं आहेत. केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी देशभरात विक्रीसाठी केवळ २२ लाख ५० हजार मेट्रिक टन साखर कोट्याअंतर्गत खुली केली आहे. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत हा कोटा अडीच लाख टनांनी कमी असल्याने बाजारात साखरेच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे.
गुरुवारी पुणे व मुंबईतील घाऊक बाजारात साखरेचे दर प्रति क्विंटल १०० रुपयांनी वाढून ४२०० ते ४२५० रुपयांवर पोहोचले. श्रावण महिन्यासह राखी, स्वातंत्र्य दिन, गोकुळअष्टमी आणि गणेशोत्सव जवळ आल्याने साखरेची मागणी वाढणार हे निश्चित आहे. त्यामुळे आगामी दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यातील ऊस गाळप हंगाम २०२४-२५ संपल्यावर साखर उत्पादन २६० ते २६२ लाख मेट्रिक टनांवर मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून जाहीर होणारे मासिक कोटेही मर्यादित प्रमाणात दिले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
कारखान्यांकडून साखरेसाठी घेतल्या जाणाऱ्या निविदांमध्येही वाढ होत असून, दर ३७५० वरून ३८५० रुपये प्रति क्विंटल इतके झाले आहेत. या निविदांवरून बाजारातील साखरेच्या संभाव्य दराचे चित्र अधिक स्पष्ट होईल, असेही व्यापारी सांगतात.
सणासुदीच्या काळात खप वाढतो आणि साखर दरही हमखास वाढतो. त्यामुळे यंदा कोट्यात झालेल्या कपातीमुळे ग्राहकांना साखर अधिक दराने खरेदी करावी लागणार आहे. केंद्र सरकारने याबाबत अतिरिक्त कोटा जाहीर करावा, अशी मागणी व्यापार संघटनांकडून होऊ लागली आहे.