अकोला न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी प्रवेशासाठी सुरू करण्यात आलेली केंद्रीकृत ऑनलाइन प्रक्रिया यंदा विद्यार्थ्यांसाठी मोठ्या त्रासाचे कारण ठरली आहे. निकाल मे महिन्यात लागूनही जुलै संपत आला तरी अनेक विद्यार्थी अद्याप कॉलेजच्या पायरीपर्यंत पोहोचलेले नाहीत. संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणी, समजण्यास कठीण प्रक्रिया आणि चुकीच्या पसंतीक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अर्ज भरण्यापासून पसंतीक्रम देण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर गोंधळच गोंधळ पाहायला मिळतो आहे. चुकीचा पसंतीक्रम निवडल्यामुळे पात्र असूनही विद्यार्थ्यांना अनुदानित कॉलेजऐवजी विनाअनुदानित किंवा इच्छा नसलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागतो आहे. याशिवाय, मिळालेलं कॉलेज नाकारल्यास विद्यार्थ्यांना थेट पुढील फेरीतून वगळले जाते, हा नियमही विद्यार्थी व पालकांच्या नाराजीस कारणीभूत ठरतो आहे.
या सर्व प्रक्रियेमुळे अनेक कॉलेजांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रवेश झाले असून, त्यामुळे वर्ग सुरू करण्यासाठी शासनाची परवानगी मिळत नाही. केवळ काही कॉलेजांनाच वर्ग सुरू करण्याची मुभा मिळाली आहे. परिणामी, शैक्षणिक वर्ष वेळेवर सुरू न झाल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करणे, परीक्षा घेणे यावर मोठा परिणाम होणार आहे.
बारावी ही बोर्ड परीक्षा असल्याने अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक असते. मात्र, उशिराने सुरू होणाऱ्या अकरावी वर्षामुळे कमी वेळात जास्त अभ्यासक्रम शिकवण्याची वेळ शिक्षकांवर येणार आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांचे शिकण्याचे प्रमाण व त्यातून निर्माण होणारी शैक्षणिक गुणवत्ता हा मोठा प्रश्न ठरतो आहे.
ऑनलाइन प्रणालीमुळे पारदर्शकता वाढण्याऐवजी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम, पालकांमध्ये अस्वस्थता आणि महाविद्यालयांमध्ये गोंधळ याचं वातावरण निर्माण झालं आहे. सुटसुटीत, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि विद्यार्थ्याभिमुख प्रणालीची नितांत गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.